आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे गटातील आमदारांसह शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जात आभिवादन केले. मात्र, एकनाथ शिंदे तिथून निघताच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी स्मृतीस्थळी जात गोमूत्र शिंपडल्याचा प्रकार उघकीस आला आहे. यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. दरम्यान, यापूर्वीही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी अभिवादन केल्यानंतर ठाकरे गटातील कार्यकर्त्यांकडून गोमूत्र शिंपडून परिसराचे शुद्धीकरण करण्यात आले होते.
एकानाथ शिंदे यांच्या बंडानंतर बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार कोण? यावरून राज्यात ठाकरे विरुद्ध शिंदे गट असा संघर्ष सुरू आहे. अशातच उद्या बाळासाहेब ठाकरे यांचा १०वा स्मृतीदिन आहे. दरम्यान, उद्या कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील आमदारांनी बाळासाहेबांच्या शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळी जात अभिवान केले. मात्र, एकनाथ शिंदे यांचा ताफा तिथून निघताच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी स्मृतीस्थळी पोहोचत याठिकाणी गोमूत्र शिंपडले. महत्त्वाचे म्हणजे यावेळी खासदार अरविंद सावंतही उपस्थित होते.
“उद्या बाळासाहेबांचा स्मृतीदिन आहे. त्यांनी आयुष्यभर आमच्यावर हिंदुत्त्वाचे संस्कार केला. गद्दारांबद्दल त्यांच्या मनात प्रचंड चीड होती. कोणी शिवसेना सोडून गेलं तर अशा आमदारांना रस्त्यात तुडवा, अशा आदेश त्यांनी याच शिवतीर्थावरून दिला होता. त्यांच्या स्मृतीस्थळावर अशी अमंगल माणसं आल्याने शिवसैनिकांनी संस्कृतीप्रमाणे गोमूत्राने ते स्वच्छ केलं”, अशी प्रतिक्रिया खासदार अरविंद सावंत यांनी दिली.