मुंबई : मुंबई महापालिका निवडणूक शिवसेना ठाकरे गटासाठी अस्तित्वाची लढाई मानली जात आहे. त्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. ‘मातोश्री’वर पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जात असून, गुरुवारपासून याला आणखी गती देण्यात येणार आहे. विभागनिहाय बैठकांच्या माध्यमातून माजी नगरसेवक, विभागप्रमुख, शाखा प्रमुख, गटप्रमुख यांच्याकडून प्रत्येक विभागाचा आढावा घेतला जणार आहे.
हेही वाचा >>> हयगय न करता करचोरी, गळती रोखा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश
शिवसेना ठाकरे गटाकडून महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची चाचपणी केली जात आहे. दुसरीकडे आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे गेल्यास काँग्रेस, राष्ट्रवादीच्या त्यांच्या मतदारसंघातील ताकदीबाबतही चाचपणी केली जात आहे. स्वबळावर निवडणुका लढल्यास तेथील संभाव्य उमेदवारांचीही माहिती विभागप्रमुखांकडून घेतली जात आहे. यासाठी शिवसेनेने (ठाकरे) ३६ विधानसभा मतदारसंघात निवडणूक निरिक्षकांची नेमणूक केली होती. या निरीक्षकांनी आपली माहिती २१ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत मांडली व अहवाल सुपूर्द केला. त्या पार्श्वभूमीवर आता २६ ते २९ डिसेंबरपर्यंत विभाग निहाय बैठका ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्याकडून घेतल्या जाणार आहेत.
२६ डिसेंबर रोजी बोरिवली, दहिसर, मागाठणे, दिंडोशी, चारकोप, कांदिवली, मालाड विधानसभेची, २७ डिसेंबर रोजी अंधेरी, विलेपार्ले, वांद्रे, कुर्ला येथील पदाधिकाऱ्यांची, २८ डिसेंबर रोजी मुलुंड, विक्रोळी, भांडुप, मानखुर्द, घाटकोपर, चेंबूर, सायन कोळीवाडा, तर २९ डिसेंबर रोजी धारावी, वडाळा, माहीम, शिवडी, वरळी, भायखळा, मुंबादेवी येथील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात येणार आहेत. त्यानंतर मुंबईत शाखानिहाय भेटी देऊन तेथील शाखाप्रमुख, गटप्रमुखांच्या मागे पाठबळ उभे करण्याची ठाकरे यांची रणनीती आहे. दरम्यान, एलिफंटा बोट दुर्घटनेत ३५ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या आरिफ बामणे यांचा उद्धव ठाकरे यांच्याकडून सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे अजमेर दर्ग्याखाली शिवमंदिर असल्याचा दावा केला जात आहे. या दाव्यावर न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांनी या दर्ग्यावर चढविण्यासाठी चादर पाठविली आहे. ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा ८१३ वा उरूस लवकरच सुरू होत असून, यानिमित्त ही चादर ‘मातोश्री’ निवासस्थानी खादिम सय्यद जिशान चिश्ती यांच्या सुपूर्द करण्यात आली.