दक्षिण मुंबईतील जुन्या मोडकळीस आलेल्या १४०० हून अधिक उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न गंभीर बनला आहे. उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासासाठी धोरण आखून हा प्रश्न सोडवावा या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने शनिवारी आक्रोश आंदोलन केले.
हेही वाचा- कोकण रेल्वेवरील प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी आता लोहमार्ग पोलिसांवर
उपकरप्राप्त इमारती धोकादायक बनल्या असून यापैकी अनेक इमारती अतिधोकादायक बनल्या आहेत. परिणामी, अधूनमधून इमारत कोसळण्याची घटना घडत आहे. अनेक कुटुंबे जीव मुठीत घेऊन या इमारतींमध्ये वास्तव्यास आहेत. या इमारतींचा पुनर्विकास हाच एकमेव तोडगा आहे. मात्र या इमारतींचा पुनर्विकास अत्यंत संथगतीने सुरू आहे. आजही १४०० हून अधिक इमारती पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे राज्य सरकार आणि म्हाडाने या इमारतींचा जलगदतीने पुनर्विकास करावा, अशी मागणी करीत ठाकरे गटाने शनिवारी आक्रोश आंदोलन केले.
हेही वाचा- वरळीतील ‘त्या’ चार सदनिका महानगरपालिका ताब्यात घेणार ; किशोरी पेडणेकर यांना दणका
दक्षिण मुंबई विभाग क्र. १२ च्या वतीने शनिवारी गिरगाव, क्रांतीनगर येथे हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात खासदार अनिल देसाई, उपनेते अरुण दुधवडकर, विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, महिला विभाग संघटक युगंधरा साळेकर आणि युवासेनेचे सर्व पदाधिकारी, रहिवासी सहभागी झाले होते.