राष्ट्रवादीत घुसमट होत असल्याने ग्रामविकासमंत्री जयंत पाटील हे नाराज असल्याची चर्चा अनेक दिवस सुरू असतानाच काँग्रेस प्रवेशासाठी ते प्रयत्नशील होते, असे विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केल्याने सांगली महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर जयंत पाटील यांच्याबद्दल संशयाचे वातावरण तयार करण्यात काँग्रेसचे नेते यशस्वी झाले.
जयंत पाटील हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा अधूनमधून सुरू असते. राष्ट्रवादीत डावलले जात असल्याची भावना त्यांच्यात मध्यंतरी बळावली होती. अजित पवार यांचे नेतृत्व पुढे आल्यापासून फारशी संधी मिळत नाही, अशी त्यांची भावना झाली. सांगली महापालिकेची निवडणूक एकहाती जिंकण्याकरिता जयंत पाटील यांनी सारी शक्ती पणाला लावली असतानाच काँग्रेसच्या प्रचारसभेत बोलताना माणिकराव ठाकरे यांनी जयंत पाटील यांच्याबद्दल संभ्रमाचे वातावरण तयार केले. सोनिया गांधी यांच्या गावाबद्दल जयंत पाटील यांनी शंका उपस्थित केल्याने त्याला प्रत्युत्तर म्हणून माणिकराव ठाकरे यांनी जयंत पाटील हे सोनिया गांधी यांची भेट मिळावी म्हणून कसे प्रयत्नशील होते व त्यांनी कशी भेट घेतली होती, असे सांगितले.
जयंत पाटील यांच्या काँग्रेस प्रवेशाबद्दल ठाकरे यांनी जाहीरपणे मतप्रदर्शन केल्याने पाटील यांचा पक्षप्रवेशाचा प्रश्नच उपस्थित होत नाही, असे बोलले जाते. कारण माणिकराव ठाकरे हे जपून बोलण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. पाटील यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा सुरू असती तर ठाकरे यांनी काहीही मतप्रदर्शन केले नसते हे सुद्धा तेवढेच स्पष्ट आहे. काँग्रेसच्या या आरोपांची राष्ट्रवादीने मात्र खिल्ली उडविली. मतदारांमध्ये भ्रम निर्माण करण्याकरिताच काँग्रेसने खोटेनाटे आरोप सुरू केल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटले आहे. राज्यात राष्ट्रवादीची ताकद वाढत आहे. भविष्यात ठाकरे हे राष्ट्रवादीमध्ये सामील होऊ शकतात, असा टोलाही मलिक यांनी लगावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मी वेडाखुळा नाही
काँग्रेस प्रवेशाबद्दलची विधाने पूर्ण चुकीची असून, काँग्रेसमध्ये जाण्यास मी वेडाखुळा नाही, अशा शब्दांत जयंत पाटील यांनी ठाकरे यांचा समाचार घेतला.

मी वेडाखुळा नाही
काँग्रेस प्रवेशाबद्दलची विधाने पूर्ण चुकीची असून, काँग्रेसमध्ये जाण्यास मी वेडाखुळा नाही, अशा शब्दांत जयंत पाटील यांनी ठाकरे यांचा समाचार घेतला.