मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर बुधवारी पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या (बाळासाहेबांची शिवसेना) लोकप्रतिनिधींनी पालिका मुख्यालयात धडक दिली. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे लोकप्रतिनिधी गाफील असताना अचानक शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष कार्यालयात प्रवेश केल्यामुळे पालिका मुख्यालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही वेळातच उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक पालिका मुख्यालयात जमले आणि दोन्ही गट एकमेकांसमोर उभे ठाकले. दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये घोषणाबाजी, हमरीतुमरी, धक्काबुक्की झाली. त्यानंतर अखेर सुरक्षारक्षकांनी सर्वाना कार्यालयाबाहेर काढल्यानंतर हा संघर्ष तात्पुरता मिटला. खासदार राहुल शेवाळे आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यासह शिंदे गटाचे पदाधिकारी पालिका मुख्यालयातील शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात गेले होते. 

पालिकेची मुदत गेल्या वर्षी संपल्यापासून पालिका मुख्यालयात तसा शुकशुकाटच असतो. पक्ष कार्यालयेही ओस पडलेली असतात. त्यातही शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात एकदमच शांतता असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक पक्ष कार्यालयात येऊन बसत असतात. मात्र बुधवारी पक्ष कार्यालयात उद्धव ठाकरे गटाचे एकदोन माजी नगरसेवक उपस्थित असताना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी अचानक पक्ष कार्यालयात प्रवेश केला. पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची भेट घेण्यासाठी आलेले शिष्टमंडळ अचानक पक्ष कार्यालयात आले. पक्ष कार्यालयातील शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाला हार घातला. शिंदे गटाच्या समर्थकांनी प्रवेश केल्यामुळे आधीच उपस्थित असलेले उद्धव ठाकरे गटाचे नगरसेवक सावध झाले. काही क्षणातच शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, आशीष चेंबूरकर यांच्यासह शिवसैनिक, माजी नगरसेवक हेदेखील पक्ष कार्यालयात धडकले. या वेळी उद्धव ठाकरे गटाच्या वतीने माजी नगरसेवक गणेश सानप, सचिन पडवळ, रमाकांत रहाटे आणि शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.

बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून खासदार राहुल शेवाळे, माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, माजी आमदार अशोक पाटील, विभागप्रमुख दिलीप नाईक, प्रवक्ते नरेश म्हस्के, शीतल म्हात्रे, उपनेत्या आशा मामेडी, गिरीश धानुरकर, कुणाल सरमळकर अशी मोठी फौज होती. थोडय़ा वेळानंतर शिंदे गटाचे पदाधिकारी बाहेर जाणार इतक्यात उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी आले आणि दरवाजातच सगळे आमनेसामने आले. त्यानंतर शिंदे गटाचे पदाधिकारी पुन्हा कार्यालयात जाऊन बसले. दोन्ही गटांचे पदाधिकारी कार्यालयात जमल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी, बाचाबाची, हमरीतुमरी सुरू झाली. प्रसारमाध्यमांचीही गर्दी वाढली. पालिकेतील कार्यालये सुटण्याच्या वेळीच झालेल्या या घटनेमुळे कर्मचारीही जमा झाले. सुरक्षारक्षकांनाही काय करावे ते कळेना. अखेर सुरक्षारक्षकांनी हस्तक्षेप करून सर्वानाच कार्यालयाबाहेर काढले.

‘पालिका आयुक्तांनी भूमिका स्पष्ट करावी’

महापालिकेतील शिवसेना पक्ष कार्यालय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचेच असून एकनाथ शिंदे गटाला पक्ष म्हणून अद्याप मान्यता मिळालेली नाही, असे प्रतिपादन खासदार अरविंद सावंत यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केले. सध्या नगरसेवकांची मुदत संपलेली असताना महापालिका कार्यालयात घुसण्यामागे शिंदे गटाचा हेतू काय होता, असा सवाल करीत पालिका आयुक्तांची याबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही सावंत यांनी केली. ‘‘शिवसेना फुटीबाबत सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय निवडणूक आयोगापुढे याचिका प्रलंबित आहेत. त्यांच्या पक्षाला अद्याप आयोगाने मान्यताही दिलेली नाही. सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाचा निकाल येईपर्यंत वाट पाहावी. वातावरण बिघडविण्याचा हा प्रयत्न असून शिंदे गटाची कृती चुकीची आहे,’’ असे सावंत म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thackeray shinde faction in mumbai municipal corporation both the factions shiv sena office ysh