आज जागतिक ‘थॅलेसेमिया’ दिन : चाळीस टक्क्यांहून अधिक रुग्ण मुंबईत
राज्यात ‘थॅलेसेमियाग्रस्त’ रुग्णांमध्ये दरवर्षी वाढ होत असून यातील चाळीस टक्क्यांहून अधिक रुग्ण हे एकटय़ा मुंबईत आहेत. आजच्या ‘जागतिक थॅलेसेमिया दिना’च्या पाश्र्वभूमीवर हे वास्तव पुढे येत असून नागरिकांमध्ये थॅलेसेमियाबद्दल जागृती नसल्याने या रुग्णांची संख्या वाढत आहे. पुढील काळात जागृती न झाल्यास ही संख्या वाढण्याची भीती वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
रक्तातील दोषांमुळे निर्माण होणाऱ्या थॅलेसेमिया आजाराच्या सद्यस्थितीबाबत संपूर्ण देशातच चिंतेचे वातावरण आहे. आजघडीला देशात मोठय़ा प्रमाणावर रुग्ण नसले तरी ही संख्या हळूहळू वाढत आहे. थॅलेसेमिया वाहक (मायनर) आई-वडिलांमुळे त्यांची मुले थॅलेसेमियाचे रुग्ण होतात. थॅलेसेमिया वाहक हे आपले आयुष्य निरोगी माणसाप्रमाणे जगतात, मात्र थॅलेसेमियाग्रस्तांना वारंवार रक्त द्यावे लागते.
यात अनंत अडचणी येतात, तर काहींचा मृत्यूदेखील होतो. सध्या संपूर्ण देशात असे किमान ५ कोटी थॅलेसेमिया वाहक आढळल्याचा दावा वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांनी केला आहे.
त्यामुळे तरुणांनी लग्न करण्यापूर्वी अथवा पालकांनी मूल होण्यापूर्वी ते थॅलेसेमिया वाहक आहेत की नाहीत हे तपासून घेणे आवश्यक ठरते.
मुलांना आधार हवा
थॅलेसेमियाग्रस्त मुलांना मानसिक आधाराची नितांत आवश्यकता असून त्यांना इतर मुलांप्रमाणे विरंगुळ्याचे क्षण अनुभवता आले पाहिजेत. सध्या याबाबत जागृतीची गरज जास्त असून मुंबईत दर दोन महिन्यांत नवा रुग्ण दाखल होत आहे, असे थॅलेसेमियाग्रस्त रुग्णाच्या पालक व मुंबई थॅलेसेमिक सोसायटीच्या अध्यक्षा शिल्पा रुपारेलिया यांनी सांगितले.
मे महिन्यात रक्ताचा तुटवडा
एप्रिल ते मे महिन्यांत शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये, कंपन्या यातील बरेच जण सुट्टीवर असल्याने रक्तदान शिबिरे होत नाहीत. त्यामुळे या काळात नागरिकांनी रक्तदान करण्याची आवश्यकता आहे. मुंबईत प्रत्येक महिन्याला २५ हजार, तर राज्यात वर्षांला १५ लाख रक्ताच्या पिशव्यांची गरज भासते. ती पूर्ण करण्यासाठी मे महिन्यात शिबिरांचे आयोजन होणे अपेक्षित असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
२००२ साली अस्तित्वात आलेल्या ‘राष्ट्रीय रक्त धोरणा’ची अद्याप सरकांरकडून अंमलबजावणी झालेली नाही. तसेच राज्याच्या ग्रामीण भागात या आजाराबद्दल जागृती सरकारकडून करण्यात येत नसल्याने ग्रामीण भागात या रुग्णांची संख्या वाढते आहे. तसेच शासनाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हय़ात थॅलेसेमिया उपचार केंद्र सुरू करण्याची आवश्यकता आहे.
– विनय शेट्टी, उपाध्यक्ष, थिंक फाऊंडेशन
थॅलेसेमियाबाबत संपूर्ण राज्यभरात सरकार जनजागृती शिबिरांचे आयोजन करते आहे. रक्तदानातून मिळालेल्या रक्ताचे परीक्षण करण्यासाठी ‘एलिजा’ ही चाचणी करण्यात येते. या चाचणीपेक्षा अधिक चांगली चाचणी ‘नॅट’ ही आता राज्यासह मुंबईतील महत्त्वाच्या सरकारी रुग्णालयांमध्ये सुरू करण्यात येत आहे, ज्यामुळे थॅलेसेमियाग्रस्तांना शुद्ध रक्त मिळून त्यांना अन्य आजार होणार नाहीत. तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजनेअंतर्गत आम्ही येत्या दोन महिन्यांत राज्यातील १८ वयापर्यंतच्या सर्वच मुलांची आरोग्य तपासणी मोहीम हाती घेणार आहोत.
– डॉ. गिरीश चौधरी, साहाय्यक संचालक, आरोग्य सेवा संचालनालय