ठाणे महापालिकेच्या कळवा येथील राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयात गुरुवारी मध्यरात्री सहा वरिष्ठ विद्यार्थ्यांनी एका कनिष्ठ विद्यार्थ्यांची रॅगिंग करून त्याच्यावर ब्लेडने वार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या सहा विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी वसतिगृहाचा सचिव असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी कळवा पोलिसांनी रॅगिंगविरोधात गुन्हा दाखल करून पाचजणांना अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी शरद पाटील हा पसार झाला असून, त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
हरिश हरीकिशोर चौधरी (१९) असे पीडित विद्यार्थ्यांचे नाव असून त्याने या वैद्यकीय महाविद्यालयात  एमबीबीएसच्या पहिल्या वर्षांकरिता ऑगस्ट २०१३ मध्ये प्रवेश घेतला होता. मूळचा उत्तर प्रदेशातील जहांगीरगंजचा रहिवासी असलेला हरिश या महाविद्यालयातील वसतिगृहात राहात आहे. मंगेश प्रल्हाद राणे (२५, रा. बुलढाणा), अच्युत भास्कर नरूटे (२३, रा. सोलापूर), प्रभाकर दगडू तलवडे (२५, रा. रायगड), विरेश विठ्ठल नष्टे (२३, रा. सोलापूर), शैलेश शांताराम गडाख (२३, रा. बुलढाणा) या विद्यार्थ्यांनी त्याच्यावर रॅगिंग केले.  त्यापैकी शैलेश आणि प्रभाकर हे दोघे प्रशिक्षिणार्थी डॉक्टर आहेत तर मंगेश, अच्युत, विरेश, शरद हे चौघे एम.बी.बी.एस.च्या शेवटच्या वर्षांचे शिक्षण घेत आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश निलेवाड यांनी दिली.
तीन ते चार दिवसांपूर्वी शरद पाटील याने हरीशला सिगारेट आणण्यासाठी सांगितले, पण त्यास हरीशने नकार दिला होता. त्यानंतर गुरुवारी रात्री हरीश आपल्या मित्रांसोबत वसतिगृहातील खोलीत जेवत असताना शैलेश तिथे आला. त्याने हरीशला शरदने त्याच्या खोलीत बोलाविल्याचा निरोप दिला. त्यामुळे हरीश शरदच्या खोलीत गेला असता, त्या ठिकाणी तीन ते चार कनिष्ठ विद्यार्थ्यांची रॅगिंग सुरू असल्याचे त्याला दिसून आले. शरद आणि त्याच्या मित्रांनी या विद्यार्थ्यांसह हरीशचीही रॅगिंग केली. त्यानंतर त्यांनी सर्व कनिष्ठ विद्यार्थ्यांना खोलीबाहेर जाण्यास सांगितले, पण हरीशला थांबवून ठेवले. हरीशची पुन्हा रॅगिंग करून त्याला मारहाण केली. तसेच शरदने ब्लेडने त्याच्या छाती आणि हातावर वार केले. तसेच या घटनेबाबत कुणाला सांगितले तर जिवे मारेन, अशी धमकीही दिली. या घटनेनंतर त्यांच्या तावडीतून सुटका करीत हरीश खोलीबाहेर पळाला. ही बाब त्याने महाविद्यालयातील वरिष्ठांना कळविली आणि याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिलीे, अशी माहितीही निलेवाड यांनी दिली.

महाविद्यालयाचा भोंगळ कारभार चव्हाटय़ावर
रॅगिंगच्या या प्रकारामुळे राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचा भोंगळ कारभार चव्हाटय़ावर आला आहे. रॅगिंगच्या या प्रकाराबद्दल पीडित विद्यार्थ्यांने कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ऑल इंडिया मेडिकलचा १५ टक्के कोटा असतो, त्यातून पिडीत विद्यार्थी शिक्षणासाठी महाविद्यालयात आला आहे, अशी माहिती रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सदानंद वाघचौरे यांनी शुक्रवारी स्थायी समितीमध्ये दिली.

Story img Loader