मुंबई : ठाणे-भाईंदरदरम्यानचा अतिवेगवान प्रवास आणि वाहतूक कोंडीमुक्तीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) दोन महत्त्वाकांक्षी गायमुख-फाऊंटन हॉटेल नाका बोगदा आणि फाऊंटन हॉटेल नाका-भाईंदर उन्नत रस्ता हे दोन प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यासाठी ‘एमएमआरडीए’ने काही महिन्यांपूर्वी एकत्रित निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. नुकत्याच त्या खुल्या करण्यात आल्या असून त्याला पाच कंपन्यांनी प्रतिसाद दिला. निवडणूक रोखे खरेदीतील चर्चित ‘मेघा इंजिनीअरिंग’ आणि ‘नवयुग इंजिनीअरिंग’सह अन्य दोन कंपन्यांच्या निविदांचा यात समावेश आहे.
निविदांची छाननी करून आर्थिक निविदा खुल्या केल्या जातील. निविदा प्रक्रियेअंती नियुक्त करण्यात येणाऱ्या कंत्राटदारावर प्रकल्पाचे आरेखन तयार करण्यासह बांधकामाची जबाबदारी असेल. मात्र निविदेची संपूर्ण प्रक्रिया, प्रकल्पासंबंधीची पुढील कार्यवाही पूर्ण करून प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यासाठी आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागेल.
हे ही वाचा… मुंबई : पाच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा अटकेत
प्रकल्प असा
● ठाणे आणि मुंबईतील प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी ‘एमएमआरडीए’चा ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प
● ठाणे-भाईंदर अंतर कमी करून यादरम्यानचा प्रवास अतिजलद करण्यासाठी ‘एमएमआरडीए’चा गायमुख- फाऊंटन हॉटेल नाका दुहेरी बोगदा
● फाऊंटन हॉटेल नाका-भाईंदर उन्नत रस्ता. दोन्ही प्रकल्पांचे एकत्रित काम
● बोगदा प्रकल्प ५.५ किलोमीटर लांबीचा, तर उन्नत रस्ता १० किलोमीटर लांबीचा
● संपूर्ण प्रकल्पासाठी २० हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित
● नवयुग इंजिनीयरिंग, मेघा इंजिनीयरिंग, एल ॲण्ड टी, ॲफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर आणि ऋत्विक प्रोजेक्टर या पाच कंपन्यांच्या निविदा