मुंबई : बोरिवलीवरून ठाण्याला केवळ २० मिनिटांत पोहोचता यावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा (भूमिगत मार्ग) प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मात्र प्रकल्पाच्या नियोजनानंतर प्रत्यक्ष काम सुरू होईपर्यंत खर्चात मोठी वाढ झाली असून साधारण ११ हजार कोटींचा हा प्रकल्प आता थेट १८ हजार कोटींवर गेला आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन शनिवारी, १३ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
ठाणे ते बोरिवली असे प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प आखला. मात्र काही कारणाने हा प्रकल्प कागदावरच राहिला. या प्रकल्पाची गरज पाहता हा प्रकल्प एमएसआरडीसीकडून एमएमआरडीएकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यानंतर एमएमआरडीएने आराखडा तयार करून आवश्यक त्या मान्यता घेत निविदा प्रक्रिया राबवली. कंत्राट अंतिम केले आणि आता शनिवारी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. प्रकल्प एमएमआरडीएकडे वर्ग झाल्यापासून ते आता प्रत्यक्षात काम सुरू होईपर्यंत प्रकल्प खर्चात मोठी वाढ झाली आहे. एमएसआरडीसीच्या आराखड्यानुसार प्रकल्पाचा खर्च ११,२३५.४३ कोटी रुपये होता. मात्र, आता तो २०२३ मध्ये १६,६००.४० कोटी रुपयांवर गेला आहे. खर्चात पाच हजार कोटी रुपयांनी वाढ झाली. तर आता निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन काम सुरू होताना प्रकल्प खर्च १८ हजार कोटी असा झाला आहे.
हेही वाचा – मुंबईत पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज
खर्च का वाढला?
दुहेरी बोगद्याच्या मूळ आराखड्यात अनेक बदल केल्यामुळे खर्च वाढल्याचे एमएमआरडीएकडून सांगितले जात आहे. एमएसआरडीसीने केवळ ११.८ किमी लांबीच्या बोगद्याचा आराखड्यात समावेश करून खर्चाचा ताळेबंद तयार केला होता. पण, एमएमआरडीएने आराखड्यात अनेक बदल केले. बोगद्याकडे जाणे-येणे सोपे व्हावे यासाठी ठाण्याच्या दिशेने घोडबंदर रस्त्यावर अंदाजे ७०० मीटरचा उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. तेथेच अंदाजे ५०० मीटरचा भुयारीमार्ग, तसेच बोरिवलीच्या दिशेने ८५० मीटर लांबीचा भुयारीमार्ग बांधण्यात येणार आहे. यामुळे प्रकल्पाच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. उड्डाणपूल, भुयारी मार्ग बांधतानाच बोगद्यात अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणा, विद्युत यंत्रणा, तसेच ‘ओपन रोड टोलिंग’ यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. दुहेरी बोगद्यात प्रत्येक ३०० मीटर अंतरावर पादचारी क्रॉस पॅसेज असतील. त्यामुळेही प्रकल्पाचा खर्च वाढल्याचे एमएमआरडीएचे म्हणणे आहे.
वादग्रस्त कंपनीस कंत्राट
दुहेरी बोगद्याच्या कामासाठी एल अँड टी आणि हैदराबादस्थित मेघा इंजिनियरिंग इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्यांनी निविदा सादर केल्या होत्या. यात मेघा इंजिनियरिंगने बाजी मारली. ही कंपनी निवडणूक रोखे खरेदीतील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. निवडणूक रोखे खरेदीमुळे मेघा इंजिनियरिंग वादात अडकली आहे. असे असले तरी आता याच कंपनीकडून ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प मार्गी लावला जाणार आहे.