मुंबई : ठाणे-बोरिवलीदरम्यानचे अंतर केवळ १२ मिनिटांत पार करता यावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. सध्या ठाण्याच्या दिशेने भुयारीकरणासाठी लॉन्चिंग शॉफ्टचे काम सुरू असतानाच आता हा प्रकल्प वेगाने मार्गी नेण्याच्या दृष्टीने ‘एमएमआरडीए’ने महत्त्वाचा टप्पा पार केला. बोगद्याच्या भुयारीकरणासाठीच्या चार टनेल बोअरिंग यंत्रांपैकी (टीबीएम) पहिले टीबीएम यंत्र तयार झाले आहे. त्याची चाचणीही यशस्वी झाली. हे पहिले स्वदेशी टीबीएम एप्रिलमध्ये चेन्नईतील ‘हेरेनकनेट’ कंपनीतून ठाण्यातील लॉन्चिंग शाफ्ट स्थळी आणण्यात येईल. सप्टेंबरमध्ये हे टीबीएम भुगर्भात सोडले जाईल आणि ऑक्टोबरच्या आरंभी भुयारीकरणाच्या कामास सुरुवात होईल. एप्रिलमध्ये ठाण्यात दाखल होणाऱ्या या टीबीएमला ‘नायक’ असे नाव देण्यात आले आहे. दरम्यान, भुयारीकरणासाठी चार टीबीएमची गरज असून उर्वरित तीन टीबीएमही लवकरच ठाणे, बोरिवलीत दाखल होतील.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन २०२४ मध्ये पंतप्रधानांचे हस्ते झाले असून त्यानंतर प्रकल्पाच्या कामास सुरुवात करण्यात आली. या प्रकल्पाचे काम हैदराबादस्थित मेघा इंजिनीयरिंग कंपनीला देण्यात आले आहे. पहिल्या टीबीएमची चाचणी यशस्वी झाल्याने आता ते चेन्नईतून ठाण्यात आणण्यास येत्या काही दिवसांत सुरुवात होईल. ११० भागांमध्ये हे टीबीएम टप्प्याटप्प्यात आणले जाईल. ठाण्यात आल्यानंतर टीबीएम जोडले जाईल. त्यानंतर टीबीएम भुगर्भात अर्थात लॉन्चिंग शाफ्टमध्ये सोडण्यासाठी सप्टेंबर उजाडेल. तर ‘नायक’द्वारे भुयारीकरणाच्या कामाला ऑक्टोबरपासून सुरुवात केली जाईल. त्यानंतर एक एक करून उर्वरित तीन टीबीएम आणून ती भूगर्भात सोडले जातील. दोन टीबीएम ठाण्याच्या दिशेने, तर दोन टीबीएम बोरिवलीच्या दिशेने भुयारीकरण करतील. तर हा प्रकल्प पूर्ण होऊन दुहेरी बोगदा वाहतूक सेवेत दाखल होण्यासाठी २०२९-३० पर्यंत ठाणेकर-मुंबईकरांना वाट पाहावी लागणार आहे.
‘नायक’ का ?
ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्यासाठी चार टीबीएमचा वापर करण्यात येणार आहे. हे टीबीएम पर्यवारणदृष्ट्या अत्यंत संवेदनशील अशा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जाणार आहे. येथील पर्यावरणाला आणि वन्यजीव, वन्यप्राण्यांच्या अधिवासाला कोणताही धक्का पोहचू नये या दृष्टीने अत्याधुनिक असे टीबीएम तयार करण्यात येत असल्याचा दावा एमएमआरडीएने केला आहे. यातूनच या टीबीएमला राष्ट्रीय उद्यानातील पक्षी, प्राणी, झाडे यांची नावे देण्याची संकल्पना पुढे आणि पहिल्या टीबीएमला ‘नायक’ असे नाव देण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले. राष्ट्रीय उद्यानात ‘नायक’नावाचे एक फुलपाखरू आहे, याच फुलपाखराच्या नावावरून पहिल्या टीबीएमला ‘नायक’ नाव देण्यात आले आहे. तर दुसऱ्या टीबीएमचे ही नाव निश्चित झाले असून लवकरच हे नाव जाहीर केले जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
१३ मीटर व्यास, २०० टन वजन
‘नायक’ टीबीएमसह उर्वरित चारही टीबीएम आतापर्यंतच्या टीबीएमच्या तुलनेत अधिक अत्याधुनिक आहे. १३ मीटर व्यासाचे , १५० मीटर लांबीचे आणि ६० मीटर रुंदीचे असे हे टीबीएम असणार आहेत. एक टीबीएम अंदाजे २०० टन वजनाचे आहे. या ‘टीबीएम’च्या माध्यमातून दिवसाला १५ मीटर भुयारीकरण करता येईल.