मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणे (एमएमआरडीए) ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाअंतर्गत भुयारीकरणासाठी टनेल बोरिंग यंत्र (टीबीएम) भूगर्भात सोडण्यासाठी बोरिवली लाॅन्चिंग शाफ्ट उभारणीत मागाठाणे येथील ५७२ झोपड्यांचा अडथळा निर्माण झाला होता. मात्र आता या झोपड्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निकाली लावून एमएमआरडीएने लाॅन्चिंग शाफ्ट उभारणीचा मार्ग मोकळा केला आहे.
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मदतीने हा प्रकल्प मार्गी लावण्यात एमएमआरडीएला यश आले असून बुधवारी पहिल्या टप्प्यात ३५ झोपडीधारकांना तात्पुरत्या सदनिकांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले. आता लवकरात लवकर ५७२ झोपड्या हटवून जागा मोकळी करून लाॅन्चिंग शाफ्ट उभारणीचे काम सुरू करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे.
भुयारीकरणास लवकरच सुरुवात
ठाणे – नवी मुंबईदरम्यानचे अंतर १२ ते १५ मिनिटांत पार करता यावे यासाठी एमएमआरडीए ठाणे – बोरिवली दुहेरी बोगदा बांधणार आहे. ११.८ किमी लांबीचा, सहा मार्गिकांचा आणि १८ हजार कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. बोगद्याच्या भुयारीकरणासाठी चार टीबीएम यंत्रणांचा वापर करण्यात येणार आहे. चेन्नईतील हेरेनकनेट कंपनीत या टीबीएमची बांधणी सुरू असून यापैकी पहिल्या नायक टीबीएमची बांधणी पूर्ण झाली आहे. हे यंत्र लवकरच मुंबईत येणार असून उर्वरित टीबीएम टप्प्याटप्प्याने मुंबईत दाखल होणार आहेत.
दरम्यान ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष भुयारीकरणाच्या कामाला सुरुवात करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. त्यामुळे एमएमआरडीएने ठाणे येथे लाॅन्चिंग शाफ्ट तयार करण्याच्या कामास सुरुवात केली आहे. लाॅन्चिंग शाफ्ट तयार झाल्यास नायक टीबीएम भूगर्भात सोडण्यात येणार आहे. त्याचवेळी प्रकल्पाच्या दुसऱ्या टोकाकडील बोरिवली लाॅन्चिंग शाफ्ट उभारणीत मोठा अडथळा निर्माण झाला होता.
बोरिवलीतील मागाठाणे येथे अंदाजे २५ हजार चौरस मीटर जागेवर लाॅन्चिंग शाफ्टची उभारणी करण्याचे एमएमआरडीएने निश्चित केले. यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली. मात्र येथील ५७२ झोपड्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गंभीर बनला. त्यांचे पुनर्वसन कुठे आणि कसे करायचे असा प्रश्न होता. हा प्रश्न निकाली निघत नसल्याने बोरिवली लाॅन्चिंग शाफ्ट उभारणीच्या कामाला विलंब होत होता. मात्र आता ५७२ झोपड्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निकाली निघाल्याची माहिती एमएमआरडीएतील सूत्रांनी दिली.
झोपडीधारकांचे तात्पुरते स्थलांतर
झोपु प्राधिकरणाच्या मदतीने या झोपडीधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे. या ठिकाणी झोपु योजना राबवून झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्यात येणार असून यासाठी विकासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ५७२ पैकी ३४३ झोपडीधारकांना शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाकडून उपलब्ध झालेल्या सदनिकांमध्ये तात्पुरते स्थलांतरित करण्यात येणार आहे.
उर्वरित झोपडीधारकांना विकसकाकडून घरभाडे दिले जाणार आहे. या निर्णयानुसार ३४३ पैकी ३५ झोपडीधारकांना बुधवारी चावी वाटप करण्यात आले आहे. आता उर्वरित झोपडीधारकांनाही चाव्या देऊन झोपड्या रिकाम्या करून घेतल्या जाणार आहेत. झोपड्या रिकाम्या झाल्यानंतर तात्काळ लाॅन्चिंग शाफ्टच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. एकूणच बोरिवली लाॅन्चिंग शाफ्ट उभारणीतील मोठा अडथळा दूर झाला असून आता ठाणे – बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या कामाला वेग येणार आहे.