मुंबई : ठाणे शहराला २०५५ मध्ये प्रतिदिन १,२३० दशलक्ष लिटर पाण्याची गरज असून, याचा अंदाज घेत पाणीपुरवठा वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या ठाणे शहराला ५० दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असून त्यासाठी सूर्या धरण, बारवी धरण औद्याोगिक विकास महामंडळ यांच्याकडून अतिरिक्त ५० दशलक्ष लिटर पाणी मिळविण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधान परिषदेत दिली.

शहराला वाढत्या लोकसंख्येनुसार पुरेसे पाणी मिळण्यासंदर्भात भाजपचे अॅड. निरंजन डावखरे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना राज्यमंत्री मिसाळ बोलत होत्या. ठाणे शहरासाठी स्वतंत्र जलसाठा निर्माण करण्याच्या उद्देशाने काळू धरण प्रकल्पाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणमार्फत (एमएमआरडीए) ३५० कोटी रुपये भूसंपादनासाठी मंजूर करण्यात आले असून, या प्रकल्पाच्या माध्यमातून ठाणे शहराला अधिक प्रमाणात पाणी मिळू शकणार असल्याचे मिसाळ यांनी सांगितले.

ठाणे महापालिकेने पाणीपुरवठा वाढवण्यासाठी विविध स्तरांवर नियोजन केले असून, मिरा-भाईंदर, मुंबई महापालिका, तसेच औद्याोगिक विकास महामंडळाकडून वाढीव कोटा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे मिसाळ यांनी या वेळी सांगितले.

Story img Loader