उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता ठाणे महापालिका प्रशासनाने शहरातील राजकीय पक्षांच्या २२ अनधिकृत कार्यालयांवर हातोडा मारण्यासाठी व्यूहरचना आखण्यास सुरूवात केली आहे. तसेच मागील कारवाईचा अनुभव लक्षात घेऊन आता ‘गुपचूप’ कारवाई करण्याची योजना महापालिका प्रशासनाने हाती घेतली आहे. त्याचप्रमाणे ज्या राजकीय पक्षांच्या कार्यालयांवर हातोडा पडणार आहे, त्या पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना या कारवाईबाबत थांगपत्ताच लागू द्यायचा नाही, असा प्रशासनाचा प्रयत्न असेल, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.
मध्यंतरी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका प्रशासनाने अनधिकृत पक्ष कार्यालयांविरोधात कारवाई सुरू केली होती. मात्र, या कारवाईविषयी राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांना माहिती उपलब्ध होत होती. त्यामुळे कार्यालयाच्या संरक्षणासाठी नेते आणि कार्यकर्त्यांचे जथ्थे जमत होते. या प्रकारमुळे कार्यालयांवर कारवाई करताना महापालिका प्रशासनाला अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे आता महापालिका प्रशासनाने अनधिकृत कार्यालयांवरील कारवाईविषयी गोपनीयता ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या कारवाईबाबत राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांना माहिती उपलब्ध होणार नाही, याची काळजी महापालिका प्रशासनाकडून घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे, कोणत्या कार्यालयांवर कधी आणि कशाप्रकारे कारवाई करायची, यासंबंधीचा निर्णय महापालिका आयुक्त आर. ए. राजीव आणि ठाणे पोलीस आयुक्त के. पी. रघुवंशी हे दोघे चर्चा करून घेणार आहेत. त्यानुसार, शहरातील अनधिकृत पक्ष कार्यालयांवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा