मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) ठाणे खाडी पूल ३ प्रकल्पातील दक्षिणेकडील मार्गिकेचे अर्थात पुण्याहून नवी मुंबई, मुंबईच्या दिशेने येणाऱया मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या काही दिवसात ते पूर्ण करून फेब्रुवारीअखेरीस ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे. त्यानंतर पुणे-मुंबई प्रवासाचा वेळ आणखी कमी होऊ शकेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे खाडी पूल १ आणि २ वरील भार कमी करण्यासाठी एमएसआरडीसीने ठाणे खाडी पूल ३ प्रकल्प हाती घेतला. त्यानुसार १.८३७ किमी लांबीच्या आणि ठाणे खाडी पूल-२ ला समांतर तीन-तीन मार्गिका असलेल्या या खाडी पूल ३ च्या प्रत्यक्ष कामाला २०२० मध्ये सुरुवात झाली. आतापर्यंत हा संपूर्ण प्रकल्प वाहतूक सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र करोना काळ आणि अन्य कारणांमुळे प्रकल्पास विलंब झाला. दरम्यान या प्रकल्पातील उत्तरेकडील मार्गिकेचे अर्थात मुंबईहून नवी मुंबई, पुण्याच्या दिशेने जाणाऱया मार्गिकेचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आॅक्टोबर २०२४ मध्ये लोकार्पण करण्यात आले.

हेही वाचा : अभ्युदयनगर पुनर्विकास : विकासकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने निविदेला मुदतवाढ देण्याचे सत्र सुरूच

उत्तरेकडील मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर दक्षिणेकडील मार्गिका वाहतूक सेवेत केव्हा दाखल होणार याची प्रतीक्षा वाहनचालक-प्रवाशांना आहे. तेव्हा याविषयी एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांना विचारले असता त्यांनी पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱया, दक्षिणेकडील मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले. हे काम येत्या काही दिवसात पूर्ण करून फेब्रुवारीअखेरीस ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होईल, असे सांगितले. एमएसआरडीसीच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमात या मार्गिकेच्या लोकार्पणाचा समावेश आहे. त्यामुळे फेब्रुवारी अखेरीस ती वाहतुकीसाठी खुली होईल आणि प्रवासी-वाहनचालकांना दिलासा मिळेल.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane creek bridge 3 work of southern route in final stage may start in february mumbai print news css