वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मानकवली खाडीवर पूल बांधणार
जागोजागी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे एरवी कटकटीचा वाटणारा ठाणे-डोंबिवली हा प्रवास आता अवघ्या २५ मिनिटांच्या अंतरावर आणण्यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) प्रयत्न सुरू केले आहेत.
डोंबिवली पश्चिमेस रेतीबंदर ते मानकवलीदरम्यान असलेल्या खाडीवर एक किलोमीटर लांबीचा पूल उभारून त्याला लागूनच नव्या रस्त्याची बांधणी करण्याच्या प्रकल्पास एमएमआरडीएने हिरवा कंदील दाखविला आहे. या पुलाच्या बांधणीसाठी कल्याणचे खासदार आनंद परांजपे यांच्या माध्यमातून एमएमआरडीएचे आयुक्त राहुल अस्थाना यांनी एका बैठकीचे आयोजन केले होते. त्यात या पुलासाठी आणि जोडरस्त्यासाठी २०० कोटींच्या निधीला तत्त्वत: मंजुरी देण्यात आली, अशी माहिती परांजपे यांनी दिली. दरम्यान, या पुलास हिरवा कंदील मिळताच त्याच्या सर्वेक्षणासाठी बुधवारी एमएमआरडीएचे कार्यकारी अभियंता सुनील देशमुख यांनी रेतीबंदर खाडी किनारी येऊन पाहणी केली.
असा असेल मार्ग
रेतीबंदर ते मानकवलीदरम्यान खाडीवरील पुलास, मानकवली दिशेने सरई, वेल्हे, अंजूर आणि मानकवली गावांजवळून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनला जोडणारा दोन किलोमीटरचा रस्ता तयार करण्यात येईल. पुलास केबल सस्पेन्शन असेल. याबरोबरच डोंबिवलीतील गावदेवी चौक (रेतीबंदर), मोठागाव रेल्वे फाटक ते रेतीबंदरदरम्यान एक ४५ फूट रुंदीचा रस्ता नव्याने तयार करण्यात येईल.
फायदा काय?
* २० किमीचा फेरा वाचणार
* कल्याण, शीळफाटा, मुंब्रा आणि काही अंशी महापे औद्योगिक पट्टय़ातील वाहतुकीवर पडणारा भारही कमी होणार
* कल्याण, डोंबिवली, मुंब्रा, भिवंडी वळण रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या कमी होणार
ठाणे-डोंबिवली २५ मिनिटांत!
जागोजागी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे एरवी कटकटीचा वाटणारा ठाणे-डोंबिवली हा प्रवास आता अवघ्या २५ मिनिटांच्या अंतरावर आणण्यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) प्रयत्न सुरू केले आहेत.
First published on: 31-01-2013 at 04:58 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane dombivali in 25 minutes only