मुंबई : ठाणे वनविभागाने काही महिन्यांपूर्वी डोंबिवली येथे छापा टाकून पिंजऱ्यात ठेवलेले वानर (ऑरंगुटान) आणि इतर काही प्रजाती जप्त केल्या होत्या. हे वन्यप्राणी सध्या नागपूरमधील गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात आहेत. दरम्यान, सध्या ऑरंगुटानला मायदेशी म्हणजेच इंडोनेशियाला पाठविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
ठाणे वनविभागाने डोंबिवली येथील एक्स्पिरिया मॉल जवळील पलावा सिटी येथील सवरना गृहसंकुलातील एका घरामध्ये छापा टाकला होता. यावेळी घरामध्ये अवैधरित्या ठेवलेले वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत प्रतिबंधित विदेशी वन्यजीव सापडले. त्यात कासव, साप, अजगर, सरडा, वानर यांचा समावेश होता. वानराला पिंजऱ्यात डांबून ठेवण्यात आले होते. वनविभागाने जप्त केलेल्या ऑरंगुटानला नोव्हेंबर महिन्यातच गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाकडे सुपूर्द करण्यात आले होते. दरम्यान, यासंदर्भात वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखा, पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालय इंडोनेशियातील सरकारशी सध्या चर्चा करीत आहेत. आयात परवान्यासाठी अर्ज केल्यानंतर ऑरंगुटानला मायदेशी पाठविण्याची प्रक्रिया सुरू होईल.
ऑरंगुटानला जप्त केल्यानंतर वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेने त्याची माहिती मुळ देशाला (इंडोनेशिया) कळवली होती. एक महिन्यापूर्वी इंडोनेशियन सरकारला पत्र पाठवले होते. इंडोनेशिया सरकारने आयात परवान्यासह पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाशी संपर्क साधल्यानंतर ऑरंगुटानला मायदेशी पाठविण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होईल. गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात पशुवैद्यांचे एक पथक ऑरंगुटानची काळजी घेत आहे. त्यावर तज्ज्ञांमार्फत योग्य ते वैद्यकीय उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, इंडोनेशियातील बोर्निया येथील ही मुळची प्रजाती अधिवास नष्ट झाल्याने, शिकारीमुळे आणि तस्करी प्रकरणांमुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.