ठाणे आणि दिवा मार्गावरील बोगद्यातील रेल्वे मार्ग बदलण्याचे काम करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने १ एप्रिलपासून ३० मे पर्यंत दररोज दोन टप्प्यांमध्ये १५ मिनिटांचा ट्रॅफिक ब्लॉक घेण्याचे जाहीर केले आहे. यामुळे ठाणे ते कल्याण मार्गावरील वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
ठाणे ते दिवा दरम्यान पाचवा-सहावा मार्ग टाकण्यात येत असून मुंब््रय़ापुढील बोगद्यामध्ये असलेला रेल्वे मार्ग वळविण्याचे काम सध्या सुरू आहे.
सकाळी ११.३५ ते ११.५० आणि दुपारी तीन ते सव्वातीन या काळात हा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे धीम्या मार्गावरील वाहतूक तसेच काही उपनगरी गाडय़ांच्या फेऱ्या जलद मार्गावर वळविण्यात आल्या आहेत.
कल्याणसाठी छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून सुटणारी १०.३३, १०.४३, दुपारी २.०१ वाजताची धीमी गाडी तसेच सकाळी ११ वाजताची टिटवाळा जलद आणि दुपारी २.०९ वाजताची टिटवाळा धीमी या सर्व गाडय़ा जलद मार्गावरून जातील. तर कल्याणहून छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे येणाऱ्या ११.१८, ११.२२, ११.२५, २.३९ आणि २.४३ या गाडय़ा दिवा ते मुलुंड दरम्यान जलद मार्गावरून सोडण्यात येणार आहेत.