सहजसोपे, पण आशयपूर्ण संवाद आणि कसदार अभिनयातून गौतम बुद्धाचे तत्त्वज्ञान उलगडून दाखवणाऱ्या उल्हासनगर येथील सी.एच.एम. महाविद्यालयाच्या ‘मड वॉक’ या एकांकिकेने ठाणे विभागातून अव्वल क्रमांक पटकावत ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या महाअंतिम फेरीत प्रवेश केला, तर ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयाची ‘मोजलेम’ आणि वसईच्या सेंट गोन्सालो गार्सिया महाविद्यालयाची ‘कुछ तो मजा है’ या एकांकिका दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानाच्या मानकरी ठरल्या.
‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या ठाणे विभागाची फेरी शनिवारी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार
अंतिम फेरीत सहभागी झालेल्या पाच एकांकिकांमध्ये विजेत्या तीन एकांकिकांसह पनवेलच्या सी.के.टी. महाविद्यालयाची ‘माणसापरिस मेंढरं बरी’ आणि कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयाची ‘अर्ध भिजलेली दोन माणसं’ या अन्य दोन एकांकिकांचाही समावेश होता, मात्र अंतिम फेरी खऱ्या अर्थाने गाजवली ती ‘मड वॉक’ आणि ‘मोजलेम’ या दोन एकांकिकांनी. गौतम बुद्धाचे तत्त्वज्ञान नेमकेपणाने उलगडून दाखविणाऱ्या श्रीपाद देशपांडे यांची ‘मड वॉक’ ही एकांकिका या वेळी परीक्षकांसह उपस्थितांची दाद मिळवून गेली. ‘जुनं होण्यात मजा नाही.. तर प्राचीन होण्यात मजा आहे’, ‘माहीत असलेल्या सत्यावर स्वत:ची सही मारत फिरणे ही माणसाची जुनी खोड आहे’ अशा प्रकारची विनोदी, पण आशयगर्भ टिपणी करणारी ही एकांकिका मनाचा ठाव घेणारी ठरली. जगात बुद्धांच्या सर्वाधिक मूर्ती का आहेत? या प्रश्नावर ‘बुद्धाशिवाय एवढे टाकीचे घाव कोणाला सोसले असते?’ या एकांकिकेतील प्रतिप्रश्नाने काही क्षण सर्वानाच निरुत्तर केले. या एकांकिकेत प्रमुख भूमिकेत वावरणाऱ्या अभिजीत पवार यांनी उभे केलेले ‘बेन्जामिन’ हे पात्र विशेष प्रभावी ठरले.
तिसरा क्रमांक पटकावणारी जोशी-बेडेकर महाविद्यालयाची ‘मोजलेम’ ही एकांकिकाही उपस्थितांची दाद मिळवून गेली. ४० पेक्षा अधिक कलाकार, तितक्याच बॅकस्टेज कलावंतांची फौज, डोळ्यांत भरणारे नेपथ्य आणि सकस संहिता हे या एकांकिकेचे वैशिष्टय़ ठरले. नाझी फौजांच्या छळछावण्यांमधून मृत्यूला कवटाळू पाहणाऱ्या ज्यू कैद्यांमध्ये जगण्याची उमेद निर्माण करणारी ‘थिअरी’ मांडू पाहणारा पवन ठाकरे याने साकारलेला ‘डॉक्टर व्हिक्टर’ सर्वात उजवा ठरला. अपत्य नसलेल्या दाम्पत्यांची व्यथा आणि कथा असलेल्या ‘कुछ तो मजा है’ या एकांकिकेतून सेंट गोन्सालो गार्सिया महाविद्यालयाने तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले.
*अतिशय दमदार अशा सादरीकरणामुळे महाअंतिम फेरीत कोण स्थान पटकविणार याविषयी सगळ्यांनाच उत्सुकता होती. जोशी-बेडेकर महविद्यालयाची ‘मोजलेम’ आणि सी.एच.एम. महाविद्यालयाची ‘मड वॉक’ या दोन एकांकिकांनी सादरीकरणादरम्यानच उपस्थितांची दाद मिळवली होती. त्यामुळे अव्वल स्थानासाठी या दोघांतच प्रामुख्याने चुरस होती.
*उत्कृष्ट अभिनेता, संगीत, दिग्दर्शन, नेपथ्य, लेखन अशा पारितोषिकांवर ‘मड वॉक’ आणि ‘मोजलेम’ या दोन एकांकिकांचे वर्चस्व राहिले. त्यामुळे या दोन्ही महाविद्यालयांतील उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. सवरेकृष्ट अभिनयाची दोन पारितोषिके या दोन्ही महाविद्यालयांच्या मुख्य पात्रांनी पटकावली तेव्हा दोन्ही बाजूंकडील विद्यार्थ्यांनी एकमेकांना टाळ्या वाजवून दाद दिली.
*तरीही महाअंतिम फेरीचे दरवाजे कुणासाठी खुले होणार याची उत्सुकता कायम होती. वसईच्या सेन्ट गोन्सालो गार्सिया महाविद्यालयाच्या एकांकिकेने तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकाविताच ही उत्कंठा शिगेला पोहोचली. द्वितीय क्रमांकाची घोषणा होण्यापूर्वी निवेदकाने ‘हा क्रमांक कुणालाच नको असतो’, अशा अर्थाने केलेल्या विधानाने दोन्ही बाजूंकडील स्पर्धकांच्या हृदयाचा ठोका चुकला.
*अखेर द्वितीय क्रमांकासाठी जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या ‘मोजलेम’ एकांकिकेची घोषणा होताच सी.एच.एम. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘विजय आपलाच’ या न्यायाने एकच जल्लोष केला, मात्र काही क्षणातच भानावर येत जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या स्पर्धकांना त्यांनी उभे राहून दाद दिली, तर ‘सीएचएम’चे कलाकार पारितोषिक घेण्यासाठी व्यासपीठाकडे जात असताना स्पर्धक महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा