ठाणे महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांच्या धमकीवजा इशाऱ्यानंतर घंटागाडी कामगारांच्या आंदोलनामध्ये फूट पडण्यास सुरूवात झाली आहे. या आंदोलनातून माघार घेत ६० टक्के कामगार कामावर परतल्याचा दावाही महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
‘समान काम आणि समान वेतन’ या मागणीसाठी ठाणेकरांना वेठीस धरत शहरातील घंटागाडी कामगारांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले. कामगारांनी आंदोलन मागे घ्यावे, त्यानंतरच चर्चा करावी, अशी भूमिका महापालिका आयुक्तांनी घेतली आहे. पण, तरीही घंटागाडी कामगार आंदोलन मागे घेण्यास तयार नसल्याने आंदोलनाचा तिढा अद्याप सुटू शकलेला नाही. येत्या तीन दिवसांत कामगारांनी आंदोलन मागे घेतले नाहीतर ठेकेदारामार्फत नव्या कामगारांची भरती करण्यात येईल, असा इशारा आयुक्त असीम गुप्ता यांनी नुकताच दिला होता. दोन आठवडे उलटूनही काहीच तोडगा निघत नसल्याने कामगारांमध्ये अस्वस्थता आहे. यातूनच काही कामगारांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी सकाळी ज्युपिटर रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या जागेत पार्किंग केलेल्या घंटागाडय़ा काही कामागारांनी सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्यास काही कामगारांनी विरोध केला. यातूनच कामगारांमध्ये आपआपसात वाद झाले. त्यामुळे कामगारांच्या आंदोलनात आता फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. यातूनच पोलिसांनी लाठीहल्ला केल्याचे काही कामगारांकडून सांगण्यात आले. लाठीहल्ल्यात घंटागाडी कामगारांचे नेते महेंद्र हिरवाळे हे जखमी झाले आहेत. उपचार करून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती काही कामगारांनी दिली. मात्र, असा हल्ला झालाच नसल्याचा दावा करत या प्रकरणी सुमारे ५५ कामगारांना अटक करून त्यांची जामीनावर सुटका करण्यात आल्याचे वर्तकनगर पोलिसांकडून सांगण्यात आले.