स्थानिक संस्था कर भरण्यासाठी ठेंगा दाखविणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात ठाणे महापलिकेने कठोर पाऊले उचलली असून अशा व्यापाऱ्यांना येत्या दोन दिवसांत कर भरण्याची अंतिम मुदत दिली आहे. या मुदतीत कर न भरणाऱ्या व्यापाऱ्यांना एप्रिल महिन्यापासून दोन टक्के व्याज आकारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
ठाणे महापालिका आयुक्त असीम गुप्ता आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग, ठाणे युनिटचे पदाधिकारी यांची नुकतीच बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय आयुक्त असिम गुप्ता यांनी घेतला. बांधकाम परवानगी घेताना क्षेत्रफळानुसार स्थानिक संस्था कराची ५० टक्के रक्कम भरावी लागत असून त्यापैकी दहा टक्के प्लींथ परवानगी देताना आणि उर्वरित ४० टक्के रक्कम २४ महिन्यांच्या कालावधीत किंवा भोगवटा प्रमाणपत्राची तारीख या पैकी जो दिवस अगोदर असेल, त्या दिवशी भरली पाहिजे, असेही या बैठकीत ठरले. मंजूर नकाशातील प्रत्यक्ष बांधकामाच्या क्षेत्रावर २० टक्के आधिक क्षेत्रफळ जमेस धरून बांधकामाचे क्षेत्रफळ अथवा वास्तू विशारद यांनी प्रमाणित केलेले क्षेत्रफळ यापैकी जे जास्त असले, ते हिशेबात धरण्याचा या वेळी झाला. तसेच बांधकामाचे क्षेत्रफळ, ठोक प्रदानाच्या रक्कमेची परिगणना, याबाबतच्या आकारणीचे सूत्र एमसीएचआय व ठाणे पालिका या दोन्हींच्याही संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याबाबतचाही निर्णय बैठकीत झाला.

Story img Loader