स्थानिक संस्था कर भरण्यासाठी ठाणे महापालिकेस वाकुल्या दाखविण्याऱ्या व्यापाऱ्यांविरोधात आता महापालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरूवात केली आहे. ठाणे येथील जांभळी परिसरात असलेल्या ‘जीवन ज्योती’ या दुकानावर महापालिकेच्या पथकाने बुधवारी पहिली धाड टाकली. स्थानिक संस्था कर भरला नसल्याने ही धाड टाकण्यात आली असून या व्यापाऱ्याने नेमका किती कर बुडविला आहे, याविषयी अधिक माहिती रात्री उशीरापर्यंत मिळू शकलेली नाही. मात्र, महापालिकेच्या या कारवाईमुळे स्थानिक संस्था कर भरण्यास असहकार दाखविणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
राज्य शासनाच्या आदेशानुसार ठाणे महापालिकेत जकात बंद करून त्याऐवजी स्थानिक संस्था कर लागू करण्यात आला. त्यास ठाण्यातील व्यापाऱ्यांनी विरोधही केला होता. दरम्यान, असीम गुप्ता यांनी महापालिकेच्या आयुक्त पदाची सुत्रे घेतल्यानंतर व्यापाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर व्यापाऱ्यांनी हा कर भरण्याची तयारीही दर्शवली होती. मात्र, सात महिन्यांचा कालावधी उलटूनही बहुतेक व्यापाऱ्यांनी हा कर भरलेला नाही. तसेच या करासंबंधीची नोंदणीही काही व्यापाऱ्यांनी केलेली नाही.  त्यामुळे महापालिकेची आर्थिक घडी विस्कटल्याने त्याचा परिणाम शहरातील विकास कामांवर होऊ लागला आहे. तसेच हा कर भरण्यासाठी व्यापाऱ्यांना महापालिकेने सवलत तसेच मुदतही दिली होती. पण, मुदत उलटूनही काही व्यापाऱ्यांनी हा कर भरलेला नाही. मध्यंतरी, कर भरत नसलेल्या व्यापाऱ्यांवर कारवाई करावी, अशी ओरड लोकप्रतिनिधींकडूनही होऊ लागली होती.
 महापालिका प्रशासनाने अशा व्यापाऱ्यांविरोधात आता कारवाई सुरू केली आहे. ठाणे येथील जांभळी नाका परिसरात असलेल्या ‘जीवन ज्योती’ या कपडय़ाच्या दुकानावर महापालिकेच्या पथकाने धाड टाकली. स्थानिक संस्था कर भरावा, यासाठी महापालिकेचे पथक या व्यापाऱ्याकडे यापुर्वी अभियानादरम्यान गेले होते. पण, तरीही त्याने एप्रिल महिन्यापासून स्थानिक संस्था कर भरलेला नाही.

Story img Loader