हुक्का पार्लर्सवर उच्च न्यायालयाने बंदी घातलेली असतानाही ठाण्यामध्ये पोलिसांच्या वरदहस्तामुळे सर्रास हुक्का पार्लर चालविले जात असल्याचे प्रकरण जनहित याचिकेद्वारे समोर आल्यानंतर या आरोपांबाबत ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना व्यक्तिश: प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. तरीही थातुरमातुर प्रतिज्ञापत्र सादर करणारे पोलीस आयुक्त के. पी. रघुवंशी यांच्याविषयी न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करीत गुरुवारी न्यायालयात हजर राहूनच त्यांनी हे स्पष्टीकरण द्यावे, असे आदेश बुधवारी दिले.
तंबाखू आणि सिगरेटविरुद्ध लढणारे ‘क्रुसेड ऑफ टॉबॅको’ या स्वयंसेवी संघटनेचे व्हिन्स्टेट नाझरेथ यांनी ही जनहित याचिका केली आहे. घोडबंदर रोड येथील ‘हॉलीवूड-१८’ या हॉटेलमध्ये सर्रासपणे हुक्का पार्लर सुरू असल्याचा दावा त्यांनी केला आहे. उच्च न्यायालयाने हुक्का पार्लर्सवर बंदी घातली असतानाही ते सर्रास चालविले जात असल्याचा याचिकादारांचा आरोप आहे.
न्यायमूर्ती अजय खानविलकर आणि न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांच्या खंडपीठासमोर त्यावर सोमवारी सुनावणी झाली. त्या वेळेस न्यायालयाने ठाणे पोलिसांना फटकारत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. पोलिसांच्या हातमिळवणीतूनच हे हुक्का पार्लर्स चालविले जात असल्याचा आरोप गंभीर असून वरिष्ठ अधिकाऱ्याला या आरोपांचे गांभीर्यच नसल्याचे त्यांच्या कृतीतून दिसत असल्याचे खडे बोल न्यायालयाने सुनावले. या आरोपांद्वारे पोलीस कशाप्रकारे छापे टाकतात आणि त्यांची पद्धत काय असते, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. त्यामुळे याचिकेद्वारे केलेले आरोप खोटे की खरे हे सांगण्याऐवजी उलट प्रतिज्ञापत्रात एकूण घटनाक्रमाबाबत मौन बाळगण्यात आल्याबाबतही न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच या आरोपांबाबत व्यक्तिश: प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश मागच्या वेळेस देऊनही आयुक्तांनी थातुरमातुर प्रतिज्ञापत्र सादर केल्याने त्याबाबतही न्यायालयाने चांगलेच खडसावले व रघुवंशी यांनी गुरुवारी न्यायालयात हजर राहून आरोपांबाबत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले.
पोलिसांची बनवाबनवी
 याचिकेनुसार, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये नाझरेथ यांनी या हॉटेलला भेट दिली होती. तेव्हा त्यांना तिथे शंभरहून अधिक तरुण हुक्का ओढताना आढळले. त्याबाबत त्यांनी नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार केली. मात्र पोलिसांनी तक्रार घेण्यास आणि कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप नाझरेथ यांनी केला आहे. नंतर हॉटेलवर छापा टाकण्यात आला. मात्र त्या वेळी सर्वकाही ठिकठाक होते. हुक्का ओढणारी मुलेही बेपत्ता झाली होती. असे दोनवेळा घडले.