रविवारी सकाळपासून झालेल्या जोरदार पावसामुळे नेहमीप्रमाणे मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली. दुपापर्यंत धीम्या गतीने सुरू असलेली अप आणि डाऊन सेवा ठिकठिकाणी रेल्वेरूळांवर पाणी साचल्याने तसेच सिग्नल यंत्रणेत घोळ झाल्यामुळे काही काळ ठप्प झाली होती. परिणामी दुपारी ठाणे ते दादर प्रवासाला तब्बल दीड तास लागत होता. सुट्टीच्या दिवशी नोकरदारांबरोबरच मुलाबाळांसह फिरायला बाहेर पडलेल्या लोकांना लोकल सेवेच्या खोळंब्याने प्रचंड त्रास सहन करावा लागला.
दुपारी एक-दीड वाजल्यानंतर कल्याण ते सीएसटी मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसला. ठाण्याला दुपारी २.३५ वाजता आलेली धीमी लोकल सुमारे ७-८ मिनिटे फलाटावरच थांबल्यानंतर सोडण्यात आली. त्यानंतर ही लोकल दादरला पोहोचेपर्यंत तब्बल ४.३० वाजले. दुपारनंतर हलक्या सरी पडत असल्या तरी सकाळी पडलेल्या जोरदार पावसामुळे संध्याकाळपर्यंत मध्य रेल्वेची डाऊन आणि अप दोन्ही मार्गावर धावणाऱ्या लोकल सुमारे दीड तास उशिराने धावत होत्या.
विद्याविहार आणि कुर्ला स्थानकांच्या दरम्यानचे रूळ पाण्यात बुडून गेले होते. परंतु, ठाणे – दादर मार्गावर दुपारी अन्य कुठल्याही स्थानकांच्या दरम्यानच्या रूळांवर पाणी साचले नव्हते. तरीसुद्धा वाहतूक अतिशय विलंबाने सुरू राहिल्याने प्रवाशांकडून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत होता.
एक दिवस सहकुटूंब फिरायला किंवा नातेवाईकांच्या भेटीला जावे तर लोकलच्या खोळंब्याने तेही जमू शकत नाही अशी खंत व्यक्त करत मुंबईकर लोकल प्रवाशांनी मध्य रेल्वेला लाखोली वाहिली.
एकीकडे मध्य रेल्वेची वाहतूक पुरती कोलमडली असतानाच जलद गाडीने दादर ते चर्चगेट प्रवासासाठीही तब्बल ४०-४५ मिनिटांचा कालावधी लागत होता. दुपारी ४.०२ मिनिटांची चर्चगेटकडे जाणारी लोकल पश्चिम रेल्वेच्या जलद मार्गाच्या चार नंबरच्या फलाटावर ४.२५ वाजता आली आणि धीम्या गतीने प्रत्येक स्थानकाच्या जवळ थांबत तब्बल ४०-४५ मिनिटांनी चर्चगेटला पोहोचली. मध्य रेल्वेची वाहतूक अतिशय धीम्या गतीने होत असल्यामुळे सीएसटीकडे जाणाऱ्या प्रवाशांनी दादरला उतरून चर्चगेटमार्गे जाण्याचा विचार केला खरा परंतु तिथेही पाऊण तास प्रवास करावा लागल्याने प्रवाशांनी पश्चिम रेल्वेच्या नावानेही बोटे मोडली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा