एसीडीसी विद्युतप्रणालीवर चालणाऱ्या तीन उपनगरी गाडय़ा पश्चिम रेल्वेकडून मध्य रेल्वेला मिळाल्या असून ठाणे-कर्जत आणि ठाणे-कसारा दरम्यान उपनगरी फेऱ्या सुरू होण्यामधला अडसर दूर झाला आहे. ३१ मार्चपासून या फेऱ्या सुरू करण्याचा प्रयत्न मध्य रेल्वे प्रशासनाचा असला तरी यामुळे हार्बर मार्गावरील १० डब्यांची गाडी सुरू करण्याचा प्रकल्प बारगळला आहे.
ठाणे रेल्वे यार्डाचे आधुनिकीकरण करण्यात आल्यावर ठाणे येथून कर्जत आणि कसाऱ्यासाठी उपनगरी फेऱ्या सुरू करण्यात येणार होत्या. कल्याणच्या पुढे उपनगरी मार्गाच्या विद्युतीकरणामध्ये बदल करण्यात आल्यामुळे एसीडीसी प्रणालीवर चालणाऱ्या गाडय़ांची आवश्यकता आहे. मध्य रेल्वेकडे अशा दोन्ही विद्युतप्रणालींवर चालणाऱ्या गाडय़ांची संख्या कमी असून पश्चिम रेल्वेकडे असलेल्या गाडय़ा मध्य रेल्वेला मिळाल्या तरच या फेऱ्या सुरू होणार असल्याचे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुबोध जैन यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. त्यानुसार पश्चिम रेल्वेने अलीकडेच तीन गाडय़ा मध्य रेल्वेला दिल्या. मात्र त्यानंतर पश्चिम रेल्वेवर बोरिवली-विरार मार्गावर फेऱ्या वाढविण्यासाठी तसेच चर्चगेट-डहाणू वाहतूक सुरू करण्यात येत असल्यामुळे आणखी चार गाडय़ा देण्यास पश्चिम रेल्वेने नकार दिल्याचे समजते. मात्र मिळालेल्या तीन गाडय़ांच्या साहाय्याने ठाणे-कर्जत-कसारा या मार्गावर २२ फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेकडे गाडय़ांची कमतरता आहे. ठाणे-कर्जत-कसारा मार्गावरील फेऱ्या वाढविण्यासाठी नव्या तीन गाडय़ा वापरण्यात येणार असल्यामुळे हार्बर मार्गावर १५ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या १० गाडय़ांचा प्रकल्प बारगळला आहे. सध्या तरी छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मानखुर्द मार्गावरील स्थानकांचा विस्तार करण्याचे काम सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Story img Loader