क्रिकेट जगतातील एव्हरेस्ट मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरनामक दंतकथेचा अखेरचा कसोटी सामना मुंबईतील वानखडे स्टेडिअमवर सुरू असून त्यानिमित्त त्याच्या विविध आठवणींना उजाळा मिळत असतानाच ठाण्यातील एक ज्येष्ठ नागरिक आणि प्रा. रमेश तेंडुलकर यांचे विद्यार्थी सुधाकर फडके यांनी सचिनच्या आजोळी म्हणजेच डोंबिवलीत काढलेली काही दुर्मीळ छायाचित्रे उपलब्ध करून दिली आहेत. आई, वडिल, आजी-आजोबा, तसेच मोठय़ा बहिण-भावडांसोबत अवघ्या काही महिन्यांचा सचिन या छायाचित्रांमधून दिसतो.
‘देव’ पावला!
१९६० मध्ये नागोठणे येथून ठाण्यात आलेल्या सुधाकर फडके यांनी बेडेकर शाळेतून मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने पुढील शिक्षणाच्या इच्छेला मुरड घालून त्यांनी उपजिविकेसाठी महिंद्रा कंपनीत कामगार म्हणून नोकरी पत्करली. नोकरी करतानाच त्यांनी आधी रसरंग आणि नंतर चित्रानंद नियतकालिकांमध्ये वार्ताहर म्हणून काम केले. याच काळात त्यांनी जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून छायाचित्रणाचे रितसर शिक्षण घेतले. या दरम्यान त्यांची प्रा. रमेश तेंडुलकर यांच्याशी ओळख झाली. त्यांनी त्यांना पुढील शिक्षण घेण्याविषयी फक्त सुचविलेच नाही, तर कीर्ती महाविद्यालयात त्यांना प्रवेशही मिळवून दिला. १९७२ मध्ये त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेश घेतला. त्याकाळात प्रा. तेंडुलकर यांच्याशी त्यांचा खूप चांगला स्नेह जमला. त्यांनी फडके यांना कीर्ती महाविद्यालयातील समारंभांच्या छायाचित्रणाचे कामही मिळवून दिले. एकदा प्रा. तेंडुलकरांनी फडकेंना डोंबिवलीत त्यांच्या सासुरवाडीत मुलाचे फोटो काढण्यासाठी आमंत्रित केले. त्यावेळी सचिन अवघा चार किंवा सहा महिन्याचा असावा असा त्यांचा अंदाज आहे. सचिनची ही छायाचित्रे अतिशय दुर्मीळ आणि अमूल्य तर आहेतच, पण त्याचबरोबर त्याचे डोंबिवलीशी असणारे ऋणानुबंधही अधोरेखीत करणारी आहेत.
सचिनमय सोशल मीडिया
अवघ्या सहा महिन्याच्या ज्या मुलाचे आपण फोटो काढतोय, तो पुढे आपल्या कर्तृत्त्वाने जगातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व होईल, याची सुधाकर फडकेंना कल्पनाही नव्हती. त्यावेळी आपण सचिनची एकूण बारा छायाचित्रे काढली, हेही त्यांच्या पक्के स्मरणात आहे. त्याच्या निगेटिव्हज्ही त्यांनी जपून ठेवल्या आहेत. पुढे सचिन नावारूपाला आल्यावर त्याला भेटून ही छायाचित्रे   देण्याचा त्यांनी प्रयत्नही केला. मात्र भेट होऊ शकली नाही. प्रा. रमेश तेंडुलकर यांच्याकडून मिळालेली शिक्षणाची प्रेरणा मात्र त्यांना अजून जपली आहे. आताही वयाच्या ६७ व्या वर्षी ते पी.एचडी. करीत आहेत.
सचिनोत्सव!
लगे रहो सचिन!
ओझाची कामगिरी सचिनला समर्पित

Story img Loader