|| मंगल हनवते
मुंबई ते ठाणे केवळ ५० मिनिटांत, बेलापूर ते ठाणे ३० मिनिटांत
मुंबई : मुंबई येथून जलदगतीने नवी मुंबईला जाता यावे यासाठी वॉटर टॅक्सी सेवा सुरू करणाऱ्या महाराष्ट्र सागरी मंडळाने मुंबई-ठाणे, तसेच नवी मुंबई-ठाणे दरम्यान ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाऊचा धक्का ते मिठानगर, ठाणे आणि बेलापूर ते मिठानगर, ठाणे वॉटर टॅक्सी लवकरच सेवेत दाखल होणार आहे. महाराष्ट्र सागरी मंडळ यासाठी लवकरच सविस्तर आराखडा तयार करणार आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर मुंबई ते ठाणे अंतर केवळ ५० मिनिटांमध्ये, तर नवी मुंबई ते ठाणे अंतर केवळ ३० मिनिटांमध्ये पार करणे शक्य होणार आहे.
जलवाहतुकीला चालना देण्यासाठी देशातील पहिली वॉटर टॅक्सी मुंबई ते नवी मुंबई जलमार्गावर सुरू करण्यात आली आहे. ही सेवा महागडी असल्याने तिला कसा प्रतिसाद मिळेल याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. असे असले तरी महाराष्ट्र सागरी मंडळाने वॉटर टॅक्सी सेवेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता मुंबई आणि ठाणे, तसेच ठाणे आणि नवी मुंबईला वॉटर टॅक्सीने जोडण्यात येणार आहे. ठाणे रेल्वे स्थानकाजवळ मिठानगर येथे एक जुनी, दुर्लक्षित जेट्टी आहे. ही जेट्टी पुनर्जीवित करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र सागरी मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. या जेट्टीचा विकास करण्यात येणार असून येथील खोली कमी असल्याने खोलीकरण करण्यात येणार असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.
मिठानगर जेट्टीचा विकास करण्यासाठी, तसेच भाऊचा धक्का ते मिठानगर आणि बेलापूर ते मिठानगर वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाकडून लवकरच आराखडा तयार करण्यात येणार आहे. हा आराखडा मंजूर झाल्यानंतर प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. सध्या प्रकल्प प्राथमिक स्तरावर आहे. पण शक्य तितक्या लवकर ठाणेकरांनाही वॉटर टॅक्सी सेवा उपलब्ध करण्याचा प्रयत्न मंडळाचा असल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले.
मुंबईतून रस्ते मार्गे ठाण्याला जाण्यासाठी सध्या किमान दीड ते दोन तास लागतात. पण भाऊचा धक्का ते मिठानगर वॉटर टॅक्सीमुळे हे अंतर केवळ ५० मिनिटांत पार करता येणार आहे. तर बेलापूर ते ठाणे अंतर पार करण्यासाठी रस्तेमार्गे एक तास लागतो. बेलापूर ते मिठानगर वॉटर टॅक्सी सेवेमुळे हे अंतर केवळ ३० मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे.
त्रिकोणी वॉटर टॅक्सी सेवा देशातील पहिली वॉटर टॅक्सी मुंबईत सुरू झाली असून आता या सेवेचे जाळे मुंबई महानगर प्रदेशात आणि पुढे रत्नागिरी, सिंधुदुर्गपर्यंत वाढविण्याचे महाराष्ट्र सागरी मंडळ आणि मुंबई पोर्ट ट्रस्टचे प्रयत्न असणार आहे. आता मात्र लवकर एमएमआरडीएत त्रिकोणी वॉटर टॅक्सी सेवा कार्यान्वित झालेली पाहायला मिळणार आहे. मुंबई ते नवी मुंबई, नवी मुंबई ते ठाणे आणि ठाणे ते मुंबई असा हा त्रिकोण असणार आहे. तर वॉटर टॅक्सीला नक्कीच प्रतिसाद मिळेल असा विश्वास महाराष्ट्र सागरी मंडळाने व्यक्त केला आहे