‘२६ नोव्हेंबरचा दिवस कधीच विसरता येणार नाही. कारण त्या दिवशी माझ्या धाकटय़ा मुलाचा वाढदिवस होताच; पण तोच दिवस माझ्या पतीच्या निधनाचाही आहे. कसाबला फाशी झाल्यावर देवाकडे उशीर असला तरी न्याय मिळतोच याची खात्री पटली,’ भावविवश झालेल्या रागिणी शर्मा सांगत होत्या.
कसाबला फाशी झाल्यावर असिस्टंट चीफ तिकीट इन्स्ट्रक्टर असलेल्या एस. के. शर्मा यांचा मृत्यू ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणीच रागिणी शर्मांनी आपल्या त्या काळ्या आठवणी सांगितल्या. ‘त्या दिवशी धाकटय़ा मुलाचा वाढदिवस होता. यांनी लवकर घरी येतो म्हणून कबूल केले होते. सायंकाळपासून त्यांना तो फोन करत होता. पण प्रत्येकवेळी ते ‘थोडय़ा वेळात येतो’, असे सांगून फोन बंद करत होते. रात्रीचे १० वाजले तरी त्यांचा पत्ता नव्हता. म्हणून त्यांना पुन्हा फोन लावला पण त्यावर नुसती रिंग होत होती. थोडय़ाच वेळात त्यांच्या मृत्यूचीच बातमी आली. त्यांना कर्तव्य बजावताना मृत्यू आला याचा मला अभिमान वाटतो, असे त्या म्हणाल्या.
कसाब आणि त्याचा साथीदार गोळीबार करत होते तेव्हा त्यांनी जराही न डगमगता लोकांना बाहेर पळायला सांगितलेच; पण कंट्रोलला फोन करून या गोळीबाराची माहिती दिली. त्यांच्या कार्यालयाबाहेरच त्यांना त्या नराधमाने गोळ्या घातल्या. आता त्याला फाशी दिल्यावर भगवानके घर देर है चा प्रत्यय आला.’ रागिणी शर्मा यांना मध्य रेल्वेच्या रोखपाल विभागात नोकरी देण्यात आली आहे. त्यांचा एक मुलगा इंजिनीअर झाला असून ज्याचा वाढदिवस होता तो मुलगा आता अकरावीत शिकत आहे.कसाबला फाशी दिल्याचे घरीच कळले होते. आज न्याय मिळाल्याचे समाधान झाले. ऑफीसला आले तर सर्वानी माझे अभिनंदन केलेच; पण मिठाई वाटून सर्वानी आपला आनंद व्यक्त केला, असेही त्या म्हणाल्या.

Story img Loader