सुमो आणि झेन गाडीतून दहा जण उतरले..त्यांच्या पाठीवर मोठय़ा बॅगा होत्या..असा बनाव करून ठाणे पोलिसांसह सर्वच सुरक्षा यंत्रणांची ‘त्या’ पडीक इमारतीच्या एका सुरक्षारक्षकाने दिशाभूल केल्याचे ठाणे पोलिसांच्या तपासात मंगळवारी उघड झाले. इमारतीच्या परिसरात लघुशंका करण्यावरून झालेल्या वादातून मारहाण होऊ नये, यासाठी त्याने हा बनाव रचल्याचे उघड झाले असून पोलिसांनी त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
घोडबंदर येथील तत्वज्ञान विद्यापीठाजवळच सात टोलेजंग इमारती आहेत. मात्र, गेल्या कित्येक वर्षांपासून कोणीच वास्तव्यास न आल्याने त्या पडीक आहेत. त्यांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षारक्षक मात्र तैनात असतात. यापैकी दुर्गाप्रसाद (२२, रा. धर्मवीरनगर) या रक्षकाने रविवारी रात्री कापूरबावडी पोलिसांना इमारतीमध्ये दहा संशयित व्यक्ती शिरल्याची माहिती दिली होती. तसेच त्यांच्या पाठीवर मोठय़ा बॅगा असल्याचे सांगितले होते. अतेरिकी आल्याचा संशयावरून पोलिसांसह सर्वच सुरक्षा यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेऊन संपूर्ण परिसर पिंजून काढला होता. शहरात नाकाबंदी आणि लॉज, हॉटेलची तपासणीही सुरू केली होती. मात्र, त्या ठिकाणी कुणीही सापडले नव्हते. अखेर पोलिसांनी दुर्गा प्रसाद यालाच ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. त्यावेळी त्याने हा बनाव रचल्याची धक्कादायक बाब उघड झाली.
रविवारी रात्री सुरक्षारक्षक दुर्गा प्रसाद याच्या पत्नीचा वाढदिवस असल्याने इमारतीच्या सुरक्षारक्षक केबीनमध्ये पार्टी सुरू होती. त्यावेळी दुर्गा, त्याची पत्नी आणि अन्य तीन सुरक्षारक्षक उपस्थित होते. त्यावेळी सुमो आणि झेन गाडीतून काहीजण उतरले आणि इमारतीच्या परिसरात अंधार असल्याने लघुशंका करू लागले. त्यामुळे दुर्गा याने त्यांना हटकले असता, त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यामुळे दुर्गा याने सुरूवातीला चोर आल्याची बतावणी करून पोलिसांना बोलाविले. त्यानुसार, पोलीस आले आणि पाहणीत काहीच आढळले नाही म्हणून निघून गेले. मात्र या व्यक्तींकडून आपल्याला मारहाण होऊ शकते, अशी भीती त्याला वाटली. पोलीस आले तर आपण वाचू शकतो, असे त्याला वाटले. तसेच या इमारतीच्या परिसरात काही महिन्यांपूर्वी ठाणे पोलिसांनी मॉक् ड्रिलही केले होते, यातूनच त्याला कल्पना सुचली आणि त्याने पोलिसांना पुन्हा बोलविण्यासाठी सुमो आणि झेन गाडीतून दहा जण उतरले..त्यांच्या पाठीवर मोठय़ा बॅगा होत्या..असा बनाव रचला होता. दुर्गाने आपल्या कृत्याची कबुली दिली आहे, अशी माहिती ठाण्याचे सह पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग यांनी ‘लोकसत्ता’ ला दिली.
‘ते’ अतिरेकी म्हणजे निव्वळ रक्षकाचाच बनाव!
सुमो आणि झेन गाडीतून दहा जण उतरले..त्यांच्या पाठीवर मोठय़ा बॅगा होत्या..असा बनाव करून ठाणे पोलिसांसह सर्वच सुरक्षा यंत्रणांची ‘त्या’ पडीक इमारतीच्या एका सुरक्षारक्षकाने दिशाभूल केल्याचे ठाणे पोलिसांच्या तपासात मंगळवारी उघड झाले.
First published on: 24-04-2013 at 04:39 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: That terrorists came news was fraud call by security guard