मुंबई : आयआयटी मुंबईच्या ‘टेकफेस्ट’चे २७ वे पर्व सर्वांच्या भेटीस आले आहे. यंदा हा महोत्सव २७, २८ आणि २९ डिसेंबर २०२३ रोजी पवईतील संकुलात रंगणार आहे. यंदाचा ‘टेकफेस्ट’ हा ‘गूढ क्षेत्र : जिथे कल्पना वास्तविकतेला भेटते’ ( द मिस्टिकल रिल्म : व्हेअर इमॅजिनेशन मीट्स रिऍलिटी) या संकल्पनेवर आधारित आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘इस्रो’चे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ, रिलायन्स जिओचे अध्यक्ष व उद्योगपती आकाश अंबानी या महोत्सवात उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. ‘दिग्गजांचे मार्गदर्शन असणारी व्याख्यानमाला’, ‘आंतरराष्ट्रीय रोबोवॉर’, ‘विज्ञान व तंत्रज्ञानाशी संबंधित नाविन्यपूर्ण स्पर्धा, खेळ आणि प्रदर्शन’, ‘इंटरनॅशनल समिट अंतर्गत फिनटेक आणि इंडस्ट्री समिट’ आदी विविध उपक्रम होणार आहेत. यंदाच्या ‘टेकफेस्ट’मध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली असून भारतातील शैक्षणिक संस्था आणि आंतरराष्ट्रीय विद्यापीठांनी सहभाग घेतला आहे.

हेही वाचा – ई – सिगारेटवर संशोधनास डॉक्टरांना बंदी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची परवानगी घेणे आवश्यक

‘टेकफेस्ट’अंतर्गतच्या व्याख्यानमालेत पहिल्याच दिवशी बुधवार, २७ डिसेंबर रोजी रिलायन्स जिओचे अध्यक्ष व उद्योगपती आकाश अंबानी हे विद्यार्थ्यांना देशातील दूरसंचार आणि डिजिटल सेवांविषयी मार्गदर्शन करणार आहेत. तसेच भारताची अत्याधुनिक बोफोर्स ४० एमएम ऑटोमॅटिक गन एल/७० चे प्रदर्शन, ट्रोन बॉईज क्रिव – इनडोअर टेक्स, आंतरराष्ट्रीय ड्रोन रेसिंग स्पर्धा, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) डॉ. जी. सथीश रेड्डी यांचे मार्गदर्शनपर सत्र होईल. तसेच रोबोटिक्स, मेषमिराइज, ‘हॅक – ए – आय’, टेकफेस्ट ऑलम्पियाड, रोबोकॅप लीग, रोबोसॉकर, रोबोरेस, रोबोसुमो आदी विविध स्पर्धा रंगतील. तसेच ‘फिनटेक आणि इंडस्ट्री ४.०’ या दोन्ही समिटमध्ये जगभरातील तंत्रज्ञान व उत्पादन क्षेत्रातील दिग्गज एकत्र येत मार्गदर्शन करणार आहेत.

‘टेकफेस्ट’च्या दुसऱ्या दिवशी गुरुवार, २८ डिसेंबर रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ‘इस्रो’चे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ हे अंतराळ क्षेत्र आणि भारताच्या अंतराळ मोहिमा, स्वतःची आजवरची वाटचाल आणि अनुभव, भारताचे अंतराळ संशोधन क्षेत्रातील भवितव्य आदी संबंधित गोष्टींबाबत उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. तसेच भारतीय सैन्य दलातील आणि एनएसजी कमांडोंच्या शस्त्रांचे प्रदर्शनही पाहता येईल. शुक्रवार, २९ डिसेंबर रोजी युके स्पेस एजन्सीचे हर्ष बीर सांघा, सीईआरएन या संस्थेतील वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रा. डॉ. अल्बर्ट डी रॉक यांचे भौतिकशास्त्रावर आधारित आणि जागतिक आव्हानांना सामोरे जात शाश्वत विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, यावर युनायटेड नेशन्स इकोनॉमिक कमिशन फॉर युरोपचे माजी कार्यकारी सचिव ओगा अल्गेरोवा यांचे व्याख्यान होईल.

तसेच टूमारोलँड मेन स्टेज ड्यूओ मॅटिस आणि सडको यांचे सायंकाळी ७ वाजता सादरीकरण, ‘फूल थ्रोटल’ची अंतिम फेरी, ‘होलोग्राम’चे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि ‘ऑटो एक्स्पो’ हे मुख्य आकर्षण असेल. तर सायंकाळी ६ च्या दरम्यान सांगता सोहळा रंगणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२३ – २४ अंतर्गत पार पडणाऱ्या ‘टेकफेस्ट’च्या विविध स्पर्धांची, उपक्रमांची माहिती प्राप्त करण्यासाठी http://www.techfest.org या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन ‘टेकफेस्ट’ समितीतर्फे करण्यात आले आहे.

रोबोंचे युद्ध रंगणार

‘टेकफेस्ट’मध्ये सर्वांचेच आकर्षण असणारी आंतरराष्ट्रीय ‘रोबोवॉर’ ही रोमांचकारी स्पर्धा यंदाही १५, ३० आणि ६० किलो वजनीगटात रंगणार आहे. या स्पर्धेची पात्रता फेरी बुधवार, २७ डिसेंबर आणि अंतिम फेरी गुरुवार, २८ डिसेंबर रोजी होणार आहे. या आंतरराष्ट्रीय रोबोवॉरमध्ये ब्राझीलचे ‘रिओबोत्झ , दक्षिण कोरियाचे ‘तीमोर्बी’ आदी विविध रोबो सहभागी होणार आहेत. विजेत्या संघाला ‘रोबोवॉर चॅम्पियन’ हा किताब आणि लाखोंचे बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.

हेही वाचा – शंभराव्या मराठी नाट्य संमेलनाचा प्रारंभ

संरक्षण दलाविषयी जाणून घेण्याची संधी

‘टेकफेस्ट’अंतर्गतच्या व्याख्यानमालेत गुरुवार, २८ डिसेंबर रोजी माजी लष्करप्रमुख मनोज एम. नरवणे, माजी नौदलप्रमुख करमबीर सिंग आणि माजी हवाईदल प्रमुख आर.के. एस भदौरिया यांच्या समूह चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे. हे तिघेजण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासह स्वतःचे अनुभव सांगणार आहेत. तसेच या व्याख्यानसत्रात विद्यार्थ्यांना संरक्षण दलातील विविध पैलूंविषयी आणि तिन्ही दलातील तांत्रिक बाजूंविषयी जाणून घेता येईल.

विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारित कार्यशाळा

विद्यार्थ्यांसाठी मशीन लर्निंग, कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉक चेन आदी विज्ञान व तंत्रज्ञानाशी संबंधित विषयांवर कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळांमध्ये आयआयटीचे प्राध्यापक आणि संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. सदर कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी techfest.org/workshops या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी नावनोंदणी करणे आवश्यक आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The 27th edition of iit mumbai techfest start from wednesday mumbai print news ssb