मुंबईः दहिसर परिसरात १३ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात एमएचबी पोलिसांना यश आले आहे. आरोपी मोहम्मद जिशान मोहम्मद मुस्लीम (२१) असे अटक आरोपीचे नाव असून तो खासगी बसवर कामाला होता.तक्रारदार महिलेची १३ वर्षांची मुलगी जवळच असलेल्या किराणा दुकानातून काही साहित्य घेऊन येत होती. त्यावेळी जिशानने या मुलीचा विनयभंग केला. याप्रकणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता कलम ७४ तसेच पोस्को कायदा ८, १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याची बाब गांभीर्याने घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप गोरडे यांनी तपास सुरू केला.

आरोपी जिशानकडे मोबाइल नसल्याचे तपास अधिकाऱ्यांना समजले. अधिक चौकशीत त्याच्या गावचे अनेक जण ॲन्टॉप हिल या परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली. जिशानने अनोळखी मोबाइल क्रमांकावरून दहिसरला राहणाऱ्या त्याच्या भावाला दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि आपण बोरिवली परिसरात असल्याची चुकीची माहिती दिली. मात्र पोलिसांनी त्या मोबाइलचे लोकेशन तपासले असता ते नाशिकच्या पुढे असल्याचे त्यांना दिसले. त्यानुसार पोलिसांनी सलग आठ ते दहा मोबाइलचे लोकेशन काढले. ते रेल्वे रूळ परिसरातील दिसून आले. त्या परिसरातील त्याच वेळेदरम्यान धावणाऱ्या रेल्वेची माहिती घेतली असता ती उत्तर प्रदेशच्या दिशेने जाणारी रेल्वे असल्याचे समजले. तसेच आरोपीचे मूळ गाव उत्तर प्रदेशमधील प्रयागराज असल्याचे समजले. त्यामुळे तो गावी जात असल्याचे उघड झाले. त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून प्रयागराज येथून त्याला ताब्यात घेत मुंबईत आणून अटक करण्यात आली.