मुंबई, पुणे : दोन वर्षे महासाथीमुळे दिवाळीत फटाक्यांचा ‘क्षीण क्षीण’ आनंद लाभलेल्या नागरिकांनी यंदा फटाक्यांची पुरती हौस भागविल्याचा परिणाम देशातील हवेच्या गुणवत्तेवर झाला आहे. शहरी भागांमध्ये हवा बिघडली असून दिल्लीतील हवेची गुणवत्ता गंभीर स्तरावर पोहोचली आहे. मुंबई आणि पुण्यासह राज्यातील शहरगावांमध्येही वातावरणावर अतिरेकी फटाक्यांचा परिणाम झाल्याचे ‘सफर’ या संस्थेने नोंदविले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सफर या संस्थेकडून देशभरातील हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण करण्यात येते.  मंगळवारी दुपापर्यंत पुण्याच्या हवेची गुणवत्ता समाधानकारक ते वाईट या स्तरावर होती. दुपारनंतर त्यात सुधारणा होऊन ती समाधानकारक पातळीवर गेली. तर मुंबईच्या हवेची गुणवत्ता वाईट स्तरावर असल्याचे दिसून आले. येत्या दोन दिवसांत पुण्याच्या हवेची गुणवत्ता सुधारण्याची, तर मुंबईच्या हवेची गुणवत्ता वाईट पातळीवरच राहण्याचा अंदाज ‘सफर’कडून वर्तवण्यात आला आहे. तर देशातील सर्वात प्रदूषित शहर असलेल्या दिल्लीतील हवेची गुणवत्ता गंभीर स्तरावर पोहोचली आहे. पुढील दोन दिवस दिल्लीतील हवेची गुणवत्ता गंभीरच राहण्याचा ‘सफर’चा अंदाज आहे.

राज्यात काय?

सफरच्या नोंदींनुसार सोमवार-मंगळवारी मुंबईची हवा वाईट पातळीवर, तर पुण्याची हवा वाईट ते मध्यम पातळीवर असल्याचे दिसून आले.

आजारांना निमंत्रण..

हवेतील धूलीकणांचे प्रमाण वाढल्यास त्याचा कमी रोगप्रतिकारशक्ती असलेल्या नागरिकांना धोका असतो. करोना आटोक्यात आला असला, तरी पावसाळय़ापासून राज्यभरात दीर्घकाळ सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत. सध्याच्या हवेत पुन्हा सर्दी-खोकला वाढण्याची भीती आहे.

एका आठवडय़ात..

गेल्या आठवडय़ात मुंबई, पुणे, दिल्ली आणि अहमदाबाद या चार शहरांच्या हवेची गुणवत्ता समाधानकारक पातळीवर होती. मात्र एकाच आठवडय़ात हवेच्या गुणवत्तेत बदल झाल्याचे दिसून येत आहे.

थोडी माहिती..

सफरच्या हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार (एक्यूआय) ५० पर्यंत एक्यूआय असलेली हवा चांगली, १०० ते २०० एक्यूआयदरम्यानची हवा सर्वसाधारण पातळीहून कमी, २०० ते ३०० एक्यूआयदरम्यानची हवा वाईट, ३०० ते ४०० एक्यूआय दरम्यानची हवा अत्यंत वाईट आणि ४०० एक्यूआयवरील हवा गंभीर मानली जाते.

काय झाले?

पावसामुळे हवेतील प्रदूषणकारी अतिसूक्ष्म कणांचे जमिनीवर राहात असल्याने हवेची गुणवत्ता चांगली असते. मात्र पावसाळा सरल्यानंतर गेल्या काही दिवसांत वाढलेल्या वाहनांच्या धुरामुळे हवेतील धूलिकणांचे प्रमाण वाढले आहे. तसेच दिवाळीमुळे करण्यात आलेल्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळेही वातावरण धूरग्रस्त झाले आहे.

काळजीसाठी काय?

हवेची गुणवत्ता सर्वसाधारण पातळीपेक्षा कमी असताना श्वास घेण्यास त्रास, दम लागणे असे प्रकार होऊ शकतात. तर वाईट पातळीवर असताना जास्त काळ घराबाहेर राहणे अपायकारक ठरू शकते. सध्या घराबाहेर मुखपट्टीचा वापर आवश्यक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The air country deteriorated situation mumbai pune serious situation in delhi ysh