भीम आर्मी भारत एकता मिशन या संघटनेचे प्रमुख चंद्रशेखर आझाद हे सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. उद्या (दि.२९) त्यांची वरळीतील जांबोरी मैदानात जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी ते मालाडच्या हॉटेल मनालीमध्ये थांबले आहेत. दरम्यान, आज (शुक्रवार) त्यांनी आपल्याला मुंबई पोलिसांनी नजरकैदेत ठेवल्याचा गंभीर आरोप केला आहे. कुठल्या कायद्यानुसार आपल्याला कैदेत ठेवण्यात आले, असा सवाल त्यांनी केला आहे.
आझाद म्हणाले, आज मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी त्यांचे स्मृतीस्थळ चैत्यभूमी येथे जाण्यासाठी निघालो होतो. मात्र, पोलिसांनी मला हॉटेलमधून बाहेर पडू दिलेले नाही. त्यामुळे मला नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा संशय आहे.
मला का आडवण्यात आले आहे. नक्की माझा दोष काय आहे, मला कळत नाही. कुठल्या कायद्यांतर्गत सरकारने मला रोखले आहे, असे अनेक सवाल त्यांनी एबीपी माझाशी बोलताना केले आहेत.
आझाद पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यानिमित्त त्यांच्या राज्यात विविध ठिकाणी पाच सभा होणार आहेत. त्यातील पहिली सभा २९ डिसेंबर रोजी वरळीच्या जांबोरी मैदानात संध्याकाळी ४ वाजता होणार आहे. त्यानंतर ३० डिसेंबरला पुण्यात सभा, ३१ डिसेंबरला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात व्याख्यान, १ जानेवारीला भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, २ जानेवारीला लातूर येथे सभा त्यानंतर ४ जानेवारीला अमरावती येथे जाहीर सभा होणार आहे.