मुंबई : अंधेरी स्थानक परिसर अतिक्रमण मुक्त करण्यात आला आहे. स्थानकाच्या आसपासच्या अनेक रस्त्यांवरील अतिक्रमणे कायमची हटवण्यात आली आहेत. मुंबई महापालिकेने पोलिसांच्या सहकार्याने ही अतिक्रमणे हटवली आहेत.
अंधेरी रेल्वे स्थानकाचा पश्चिम परिसर कायम गजबजलेला असतो. या परिसरात रिक्षा, वाहने, पादचारी, बसगाड्या यांची वर्दळ असते. त्यातच फेरीवाल्यांच्या वाढत्या संख्येमुळे परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत होती. रेल्वे स्थानक, मेट्रो स्थानक आणि बस आगार एकाच ठिकाणी असल्याने अंधेरी स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते.
अंधेरी पश्चिमकडे कॉर्पोरेट कार्यालये, वर्सोवासारखी उच्चभ्रू वस्ती आहे. त्यामुळे अंधेरी पश्चिम भागात दररोज येणाऱ्या नोकरदारांची संख्याही मोठी आहे. तसेच मेट्रो स्थानक असल्यामुळे पूर्व उपनगरात जाणाऱ्या व येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे या परिसरात पादचाऱ्यांची सतत वर्दळ असते. त्यातच गोखले पुलाचे काम सुरू असल्यामुळे अंधेरी सब-वे जवळही वाहतूक कोंडी होते. वाहतूक कोंडीमुळे अनेकदा नोकरदार मंडळी मध्येच रिक्षा सोडून चालत स्थानक गाठतात. या भागातील फेरीवाल्याची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तसेच अनधिकृत बांधकामेही उभी राहात होती. हे अतिक्रमण हटवण्यात प्रशासनाला यश आले आहे. यामुळे हा परिसर मोकळा झाला आहे.
अंधेरी (पश्चिम) स्थानक परिसरातील बेकायदेशीर अतिक्रमणांमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. नागरिक आणि पादचाऱ्यांना स्थानकाभोवतीच्या गर्दीमधून मार्गक्रमण करताना दिव्य पार पाडावे लागत होते. यामुळे वाहतूक कोंडी आणि सुरक्षिततेला धोका निर्माण होत होता. या समस्यांमुळे वाहतूक पोलिसांवरही मोठा ताण येत होता. आमदार अमित साटम यांनी याप्रकरणी पाठपुरावा करून हे अतिक्रमण हटवण्यास पालिका प्रशासनाला भाग पाडले. यामुळे वाहतूक सुरळीत झाली आणि पादचाऱ्यांना चालण्यासाठी अधिक जागा मिळाली आहे.
गेल्या काही महिन्यात अंधेरी स्थानक परिसरातील एस. व्ही. रोड, जे. पी. रोड, मस्जिद गल्ली, गझदर रोड आणि एम. ए. रोडवरील सर्व अतिक्रमणे कायमस्वरूपी हटवण्यात आली आहेत. अनेक वर्षांपासून असलेली अतिक्रमणे कायमची काढून टाकण्यात आली आहेत. यामुळे अंधेरी स्थानक परिसर वाहतूक आणि पादचाऱ्यांसाठी मोकळा झाला आहे, अशी प्रतिक्रिया आमदार अमित साटम यांनी व्यक्त केली. यामध्ये पोलीस आणि महापालिकेने सक्रिय भूमिका बजावली असल्याचेही ते म्हणाले.