आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटक करण्यात आली. त्यानंतर आज शिवसेना नेते राजन साळवींच्या घरी छापेमारी झाली. या सगळ्या प्रकरणी आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सूरज चव्हाण यांची अटक राजकीय आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसंच ८ हजार कोटींचा अँब्युलन्स घोटाळा झाल्याचाही आरोप संजय राऊत यांनी केला.
काय म्हणाले संजय राऊत?
शिंदे गटात आला नाहीत तर तुमच्यावर एजन्सींच्या मार्फत कारवाया होतील अशा धमक्या दिल्या जात आहेत. सूरज चव्हाण, रविंद्र वायकर, राजन साळवी यांना धमक्या दिल्या जात आहेत असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसंच आम्ही दोन दिवसांपूर्वी जे जनता न्यायालय केलं आणि त्याचा जो एक प्रभाव पडला, त्याच्या दुसऱ्या दिवशी सूरज चव्हाण यांना अटक झाली. सूरज चव्हाण यांची अटक ही राजकीय अटक आहे असाही आरोप संजय राऊत यांनी केला.
करोनाचा काळ एकमेकांना मदत करण्याचा होता
मुंबई महापालिकेने करोना काळात अत्यंत उत्तम कामगिरी केली. तो काळ एकमेकांना मदत करण्याचा होता, झोकून देऊन, जीव धोक्यात घालून काम करण्याचा तो काळ होता. त्या काळात शिवसेनेने आणि इतर सामाजिक संस्थांनी कोव्हिड सेंटर्स चालवली. तरीही खोटी प्रकरणं तयार करुन, साक्षी-पुरावे गोळा करुन बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. सूरज चव्हाण यांना अटक झाली, कारवाया होत आहेत. आम्ही त्या कारवायांना सामोरे जाऊ. १३८ लोकांना खिचडी वाटपाचं काम कोव्हिड काळात दिलं होतं. त्यापैकी किती लोकांच्या चौकशा झाल्या ते आर्थिक गुन्हे शाखा (EOW) आणि ईडीने समोर आणलं पाहिजे, असंही संजय राऊत म्हणाले.
३८ कंपन्या अशा आहेत ज्यांनी…
किमान ३८ अशा कंपन्या आहेत ज्यांनी खिचडीचं वाटप केलं नाही पण मुंबई महापालिकेकडून कोट्यवधींची बिलं उकळली. हे सगळे आज शिंदे गटात किंवा भाजपात आहेत असाही गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. ज्यांनी कोट्यवधी रुपये लुटलेत त्यांचे म्होरके शिंदे गटात आहेत. त्यांची चौकशी झालेली नाही. सूरज चव्हाण प्रकरणात त्यांच्याबरोबर काम करणारे सहकारी मिंधे गटात आहेत. त्यांना अटक झालेली नाही. असे चार लोक सूरज चव्हाण यांच्याबरोबर काम करत होते पण ते मिंधे गटात आहेत म्हणून त्यांना सोडलं असाही आरोप संजय राऊत यांनी केला. घोटाळ्याचे पैसे मिंधे गटाकडे गेले आहेत. ८ हजार कोटींचा अँब्युलन्स घोटाळा करण्यात आला आहे असाही आरोप संजय राऊत यांनी केला.
काय आहे नेमकं प्रकरण?
करोना काळात वाटप करण्यासाठीच्या खिचडीचा दर्जा आणि त्याचं प्रमाण घटवून यासंदर्भात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला आहे. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही विधानसभेत केलेल्या भाषणादरम्यान या मुद्द्याचा उल्लेख करून ठाकरे गटाला लक्ष्य केलं होतं. त्यामुळे हे प्रकरण चर्चेत आलं होतं. या घोटाळ्यामध्ये सूरज चव्हाण यांचा संबंध असल्याचा संशय ईडीला असून त्याअनुषंगाने अटकेची कारवाई करण्यात आली आहे. सूरज चव्हाण हे आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय असून त्यांना झालेली अटक आदित्य ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.