शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अस्थींचे उध्दव ठाकरे यांनी ‘गेट वे ऑफ इंडिया ’ येथील समुद्रात शुक्रवारी विसर्जन केले. यावेळी राज ठाकरे हेही ठाकरे कुटुंबियांसमवेत उपस्थित होते. देशभरातील प्रमुख नद्यांमध्येही शिवसेना नेत्यांकडून अस्थिविसर्जन करण्यात आले. ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथील समुद्रात अस्थीविसर्जनासाठी बोटीची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. त्यावेळी राज ठाकरे यांना चक्कर येऊ लागल्याने ते घरी परत गेले. गुजरातमधील द्वारका नदीत राजूल पटेल, अनिती बिर्जे यांनी अस्थिविसर्जन केले. शिवसेना उपनेते सूर्यकांत महाडिक, मनोहर साळवी आदींनी कन्याकुमारी येथे अस्थिविसर्जन केले. दरम्यान, शिवसेनाप्रमुखांच्या प्रस्तावित स्मारकाबाबत अन्य पक्षांनी लुडबूड करू नये. ते कुठे उभारायचे, याचा निर्णय शिवसैनिक आणि राज्य सरकार घेईल, असे प्रतिपादन शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी येथे केले. बाळासाहेबांच्या स्मारकाला विरोध करणाऱ्यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकारच नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा