विश्वासू मित्रपक्ष म्हणनू दावा करणाऱ्या राष्ट्रवादीने चार राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसला चांगलेच सुनावले आहे. राज्यकर्ता हा इंदिरा गांधी यांच्याप्रमाणे करारी, प्रभावी उपाययोजना करणारा आणि निर्णयाची खंबीरपणे अंमलबजावणी करणारा असावा, असे मत व्यक्त करीत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना लक्ष्य केले आहे. मोफत सल्ले देणाऱ्यांचा वर्ग फोफावला आहे, अशा शब्दांत सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय सल्लागार परिषदेवरही त्यांनी निशाणा साधला आहे.
शरद पवार यांनी ब्लॉगच्या माध्यमातून काँग्रेसवर टीकेची झोड उठविली आहे. दिल्लीसह चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये जो फटका बसला त्याचा काँग्रेससह यूपीएच्या सर्वच घटक पक्षांना विचार करावा लागणार आहे. या पराभवासाठी नव्या पिढीचे मोठे योगदान असून, या पिढीचा राग मतदानातून व्यक्त झाला आहे. हे निरीक्षण नोंदवतानाच निर्णय होण्यास विलंब लागत असल्याबद्दल पवार यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. घेतलेल्या निर्णयांची खंबीरपणे अंमलबजावणी करण्याची कुवत राज्यकर्त्यांमध्ये असली पाहिजे. जनतेला दुबळे राजकारणी आवडत नाहीत, हे पवार यांचे मत म्हणजे पंतप्रधान डॉ. सिंग आणि मुख्यमंत्री चव्हाण यांना अप्रत्यक्षपणे टोलाच आहे.
देशात झोळ्या घेऊन मुक्त सल्ला देणाऱ्यांचा वर्ग तयार झाला आहे. जमिनीशी कसलही नाते नसलेला हा वर्ग नवनवीन कल्पना मांडत सुटतो आणि सरकारमधील लोक त्याला बळी पडतात. या साऱ्यांचाच गांभीर्याने विचार करण्याची वेळ आल्याचे पवार यांचे मत म्हणजे काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय सल्लागार परिषदेबद्दल व्यक्त केलेली तीव्र नापसंती मानली जाते. तसेच स्वयंसेवी संस्थांच्या सल्ल्याने वागणाऱ्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनाही हा टोला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर मागे टीका करताना हाताला लकवा लागला की काय, असे विधान पवार यांनी केले होते.
सोनिया गांधी आणि राहुल गांधी महत्त्व देणाऱ्या झोळीवाल्या वर्गाला वेळीच रोखले पाहिजे, असेही पवार यांनी सुचविले आहे. खंबीर राज्यकर्ते आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांची परिणामकारक अंमलबजावणी झाल्यास अन्य शक्ती डोके वर काढणार नाहीत, असा सल्लाही पवार यांनी दिला आहे.
पवार यांचे कर्मचारीही ‘आम आदमी’चे मतदार!
आम आदमी पार्टीवर टीका करताना प्रचारात सत्तेत आल्यावर आम्ही कांदे, भाज्यांचे भाव निम्म्यावर आणू, असे आश्वासन या पक्षाच्या नेत्यांकडून दिले जाते होते. या पक्षाला आणखी पाच-सहा जागा मिळाल्या असत्या तर हा पक्ष सत्तेत आला असता. सत्तेत आल्यावर भाज्या किंवा विजेचे दर निम्म्यांवर आणून दाखवावेत म्हणजे त्यांचा फोलपणा देशासमोर येईल. भाज्यांच्या भावांवर राज्यांचे काहीच नियंत्रण नसते. उत्पादनावर आधारित दर ठरतात, असेही पवार यांनी निदर्शनास आणून दिले. दिल्लीतील तरुण वर्गाबरोबच झोपडपट्टीतील मतदारांनी आम आदमी पार्टीला मतदान केले. अगदी आपल्या सरकारी निवासस्थानातील २१ कर्मचाऱ्यांनी आम आदमी पार्टीला मतदान केल्याची माहिती पवार यांनीच दिली आहे. दिल्लीतील अवैध वसाहती नियमित कराव्यात मागणी करणारा वर्गच आम आदमी पार्टीबरोबर आहे. हाच वर्ग भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलतो आणि अवैध बांधकामे नियमित करा म्हणून मागणी करतो असा विरोधाभास बघायला मिळाला, याकडेही पवार यांनी लक्ष वेधले आहे.
‘झाडू की झप्पी’
भाजप-काँग्रेसने ‘आप’पासून धडा घ्यावा – राहुल गांधी
निकालांचा महाराष्ट्रावरही परिणाम होणार ?