मुंबई : पुरोगामी संघटनांतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘निर्भय बनो’ सभेला जाताना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या मोटारगाडीवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करीत शाईफेक केली. या हल्ल्याचा विविध स्तरांतून निषेध करण्यात येत आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाने एक पत्रक प्रसिद्ध करून वागळे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हल्लेखोरांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या सहाय्याने शोधून काढावे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मुंबई मराठी पत्रकार संघाने केली आहे. निर्भिडपणे सत्य मांडणाऱ्या पत्रकारांवर हल्ले होत असतात. पण अशा हल्ल्यांमुळे पत्रकारांचा आवाज दाबता येणार नाही, हे हल्लेखोरांनी लक्षात ठेवावे. किंबहुना पत्रकारांची लेखणी अधिक बाणेदारपणे अन्यायाविरुद्ध आणि झुंडशाहीविरुद्ध आवाज उठवित राहील, असेही मुंबई मराठी पत्रकार संघाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

हेही वाचा – मॉरिसकडे पिस्तुल ठेवण्यासाठी आर्थिक व्यवहार झाले का ? गुन्हे शाखेकडून आर्थिक व्यवहारांची तपासणी

पत्रकारांवर हल्ले करून त्यांना दाबण्याचा मूर्खपणा कुणीही करू नये. त्यामुळे खोटे लपणार नाही. सत्य हे केव्हा तरी बाहेर येणारच आहे. याचे भान ठेवावे, असे जर्नालिस्ट् युनियन ऑफ महाराष्ट्रने म्हटले आहे. तुम्ही धमक्या दिल्या, रस्ता अडवला, गाड्या फोडल्या तरीसुद्धा सभा झालीच. पत्रकार निखिल वागळे, विश्वंभर चौधरी, ॲड. असीम सरोदे यांच्यावरील भ्याड हल्याचा छात्रभारती निषेध करते, अशा आशयाची पोस्ट छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे राज्य अध्यक्ष रोहित ढाले यांनी समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केली आहे. तसेच ठाकरे गटाच्या शिवसेनेनेही समाजमाध्यमांवर तीव्र निषेध केला आहे.

हेही वाचा – आर्यन खानच्या सुटकेसाठी लाच मागितल्याचे प्रकरण : ईडीने दाखल गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी समीर वानखडे उच्च न्यायालयात

पत्रकार संघटना व राजकीय पक्षांकडून निषेध होत असताना मराठी कलाविश्वातूनही निखिल वागळे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध होत आहे. अभिनेत्री वीणा जामकरने ‘निखिल वागळे, चौधरी सर आणि ॲड. असीम सरोदे यांच्यावरील हल्ल्याचा जाहीर निषेध!!’, अशा आशयाची पोस्ट समाजमाध्यमांवर केली आहे. नुकतेच ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेले अभिनेते किरण माने यांनीही एका पोस्टद्वारे या घटनेचा निषेध केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The attack on senior journalist nikhil wagle has been condemned from various levels mumbai print news ssb