मुंबई: ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक मारूती चितमपल्ली व ज्येष्ठ पक्षीशास्त्र डॉ सलीम अली यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ५ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत पक्षी सप्ताह साजरा करण्यात येतो. राज्यातील जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने निसर्गातील प्रत्येक घटकाचे महत्त्व विशद व्हावे, तसेच जनजागृती व्हावी हा यामागील उद्देश आहे. या पार्श्वभूमीवर बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीमध्ये (बीएनएचएस) डॉ. सलीम अली यांच्या वस्तूंचे, त्यांनी काढलेल्या चित्रफितींचे, तसेच त्यांच्या पत्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
‘द बर्डमॅन ऑफ इंडिया’ अशी ओळख असलेले डॉ. सलीम अली यांची वन्यजीव आणि पक्ष्यांविषयीची कारकिर्द उल्लेखनीय आहे. त्यांनी वापरलेले कॅमेरा, टेलिस्कोप, व्हिडिओ चित्रिकरणासाठी वापरलेले यंत्रसामग्री, टेप रेकॉर्डर, पक्षी निरीक्षणासाठी वापरेलेली दुर्बिण आदी साहित्य प्रदर्शन मांडण्यात आले आहे. याचबरोबर त्यांनी त्यांच्यासोबत ठेवलेली नोंद वही, त्यांना मिळालेली पत्रे यांचे काही नमुनेदेखील या प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत. हे सर्व साहित्य उपलब्ध होते. परंतु पहिल्यांदाच ३० वर्षांनंतर ते प्रदर्शन स्वरूपात मांडण्यात येत असल्याचे बीएलएचएसच्या ग्रंथपाल निर्मला बरुरे यांनी सांगितले.
हेही वाचा… कामा रुग्णालयामध्ये बहरणार दुसरे मियावाकी जंगल
डॉ. सलीम अली यांनी स्वतः पक्ष्यांना केलेल्या रिंगिंगच्या चित्रफितींचे स्क्रिनिंग येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत करण्यात येत आहे. रिंग केलेला पक्षी शिकारी किंवा स्थानिकांना मिळाल्यानंतर त्यांनी पाठवलेली पोस्टकार्डही या प्रदर्शनात मांडली आहेत.
डॉ. सलीम अली यांचे काम सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा हा एक प्रयत्न आहे. हे प्रदर्शन मांडल्यानंतर अनेकांनी डॉ. सलीम अली यांचे साहित्य आपल्याकडे असल्याचे कळवीले आहे. त्यानिमित्ताने आता या संग्रहात आणखी भर पडणार आहे. – किशोर रिठे, संचालक, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी