मुंबई : यंदा गणेशोत्सव निर्बंधमुक्त वातावरणात साजरा करण्यासाठी गणेशोत्सव मंडळांची लगबग सुरू आहे. मात्र, वाढती महागाई आणि बहुतांश वस्तूंवर लागू झालेला वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) यांचा भार कसा सोसायचा असा प्रश्न बहुतांश मंडळांना पडला आहे. त्यामुळे जीएसटी रद्द करण्याची मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केली आहे.
सजावट, विद्युत रोषणाई, मंडप, फलके आदी सेवांवर १२ ते १८ टक्के जीएसटी आकारला जात आहे. ज्यामुळे गणेशोत्सव मंडळाच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. सजावट, मंडपाविना सार्वजनिक उत्सव साजरा करता येणार नाही. करोनामुळे मुंबईतील बहुतांश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची आर्थिक स्थिती बिघडली आहे. यात जीएसटीमुळे आणखी पिळवणूक होत आहे. गणेशोत्सवावर जीएसटीह्णच्या रुपाने आलेले विघ्न दूर करून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दिलासा द्यावा, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी केली आहे. गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तूंवरील जीएसटी रद्द केल्यास सार्वजनिक मंडळांवरील आर्थिक भार कमी होईल. बचतीची रक्कम मंडळांना उत्सवकाळात लोकोपयोगी उपक्रमांसाठी खर्च करता येईल. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना जीएसटी नोंदणीचे बंधन नाही. मग त्यांनी जीएसटीचा भुर्दंड का सहन करावा, असा प्रश्न सार्वजनिक मंडळाकडून उपस्थित करण्यात येत आहे.