मुंबई: अगदी पहिलीपासून शाळेबरोबरच खासगी शिकवण्यांचे पेव गेली जवळपास तीन दशके देशभरात फोफावल्यानंतर आता केंद्र शासनाने दहावीच्या खालील किंवा १६ वर्षांखालील विद्यार्थ्यांना खासगी शिकवणीस प्रवेश देण्यास मनाई केली आहे. खासगी शिकवण्यांसाठी केंद्र शासनाने नियमावली जाहीर केली आहे.
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, विविध स्पर्धा आणि प्रवेश परीक्षांच्या तयारीच्या नावाखाली वाढलेली खासगी शिकवण्यांची दुकानदारी आणि मनमानी कारभारावर अंकूश ठेवण्यासाठी केंद्राने शिकवण्यांसाठी नियमावली जाहीर केली आहे. स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी राजस्थानमधील कोटासह देशभरातील अनेक शहरे खासगी शिकवण्यांसाठी प्रसिद्धीस पावत आहेत. विद्यार्थ्यांना उसंत न देता, काळ वेळ न पाहता परीक्षेसाठी घोकंपट्टीचा रेटा लावणाऱ्या शिकवण्यांच्या कारभारावर सातत्याने टीकाही होत असते. विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्यांमुळे या शिकवण्यांचा कारभार गेल्या दोन वर्षांपासून अधिक चर्चेत आहे. त्याबाबत खासदारांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर अखेर केंद्राने खासगी शिकवण्यांना नियमावलीच्या चौकटीत बांधण्याचा प्रयत्न केला आहे. या नियमावलीनुसार आता इयत्ता पहिलीपासून सुरू असलेले शिकवणी वर्ग बंद करावे लागण्याची शक्यता आहे.
हेही वाचा… धारावीतील भूखंड ‘अदानी’ ला आंदण? गृहनिर्माण विभागाच्या पत्रामुळे संभ्रम
दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या किंवा वयाची १६ वर्षे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनाच आता शिकवणी वर्गाला प्रवेश देता येणार आहे. त्यामुळे शालेय अभ्यासक्रमाला पूरक ठरणाऱ्या शिकवण्या बंद होण्याची शक्यता असून दहावीनंतर देता येणाऱ्या प्रवेश आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीपुरताच शिकवण्यांचा आवाका राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर किमान पदवी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाच शिक्षक म्हणून नियुक्त करता येईल. त्याचबरोबर प्रत्येक शिकवणी वर्गाने समुपदेशाची नियुक्ती करणे आवश्यक आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शिकवण्यांना १ लाख रुपयांपर्यंत दंड करण्याची किंवा नोंदणी रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यांत नव्याने सुरू होणाऱ्या किंवा असलेल्या शिकवण्यांनी नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नोंदणी, पडताळणी, कारवाई आणि एकूण नियमनाची जबाबदारी राज्य शासनांची असेल, असेही नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे.
जाहिरातबाजी बंद
कोणत्याही परीक्षेत अव्वल आलेले विद्यार्थी आपल्याच शिकवणी वर्गात शिकल्याचे फलक लावण्यासाठी चालणारी खासगी शिकवण्यांची अहमहमिका बंद करण्यासाठीही नियमावलीत तरतूद करण्यात आली आहे. गुणवत्ता यादीत स्थान मिळेल असा दावा शिकवण्यांना करता येणार नाही किंवा तसे आश्वासनही पालकांना देता येणार नाही. थेट किंवा आडवळणाने अशा स्वरूपाच्या जाहिराती करण्यासही मनाई करण्यात आली आहे.
संकेतस्थळावर सर्व माहिती देणे बंधनकारक
शिकवण्यांच्या संकेतस्थळावर सर्व सुविधा, शुल्क, शिक्षकांची माहिती, त्यांची पात्रता, समुपदेशकांचे तपशील, अभ्यासक्रम, अभ्यासक्रमाचा कालावधी, वसतीगृह असल्यास त्याचे तपशील, शुल्क आदी तपशील जाहीर करणे बंधनकारक आहे.
आठवड्याची सुट्टी हवी
शिकवण्यांनी आठवड्याची सुट्टी देणे, तसेच सण, उत्सवांच्या कालावधीत सुट्टी देणे बंधनकारक आहे. सुट्टीच्या दिवशी कोणतीही परीक्षा घेण्यात येऊ नये, असेही या नियमावलीत नमूद करण्यात आले आहे.
प्रवेश रद्द झाल्यास शुल्क परत मिळणार
एखाद्या विद्यार्थ्याने प्रवेश घेतल्यावर काही कालावधीनंतर प्रवेश रद्द केल्यास त्याला राहिलेल्या कालावधीसाठीचे शुल्क परत करण्यात यावे. त्याचबरोबर वसतीगृह, खानावळ याचेही शुल्क परत करण्यात यावे अशीही तरतूद करण्यात आली आहे.
नियमावलीनुसार शिकवणी संस्था म्हणजे काय?
शिकवणी संस्था म्हणजेच कोचिंग सेंटर म्हणजे पन्नास किंवा त्यापेक्षा अधिक विद्यार्थ्यांची शालेय, महाविद्यालयीन किंवा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाला पूरक, स्पर्धा परीक्षा किंवा प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी खासगी शिकवणी घेणाऱ्या संस्था असे नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे. कला, खेळ किंवा तत्सम प्रशिक्षण वर्गांसाठी ही नियमावली लागू होणार नाही. तसेच घरगुती स्वरूपात घेण्यात येणाऱ्या शिकवण्यांचाही या नियमावलीत उल्लेख नाही. त्यामुळे दहावीच्या खालील विद्यार्थ्यांच्या घरगुती शिकवण्यांसाठी ही बंधने लागू होणार नाहीत.
शिकवणी संस्थांना शाळा किंवा महाविद्यालयांच्या वर्गाच्या वेळा वगळून वर्ग घ्यायचे आहेत.