मुंबई : तुम्ही नेहमी पांढरे कपडेच का घालता, दाढी का ठेवता, शाळेत असताना शिक्षकांचा मार खाल्ला होता का.असे अनेक प्रश्न लहान मुलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले आणि मुख्यमंत्र्यांनीही त्यांना खुमासदार उत्तरे दिली. परळच्या डॉ. शिरोडकर विद्यालयातील बालदिन सोहळय़ात मुख्यमंत्री शिंदे सोमवारी मुलांमध्ये रमले.

मुख्यमंत्री शिंदे यांनी बालदिनानिमित्त शिरोडकर विद्यालयास भेट देवून मुलांशी तासभर गप्पा मारल्या आणि त्यांच्याबरोबर सेल्फीही घेतली. मुख्यमंत्री दुपारी सव्वा चारच्या सुमारास शाळेत आले. तेव्हा चिमुकल्यांनी स्वत: तयार केलेल्या शुभेच्छापत्रे व गुलाबाच्या फुलांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. एक विद्यार्थी म्हणून मी आज माझ्या शाळेतल्या आठवणी जागवायला आलो आहे. बालपणातील निरागसपणा सर्वानी जपायला हवा. अभ्यास करताना दडपण घेऊ नका, असा सल्ला मुख्यमंत्री शिंदे यांनी मुलांना दिला. मुलांच्या बिनधास्त प्रश्नांना मुख्यमंत्री शिंदे यांनी मोकळेपणे उत्तरे दिली. आई-बाबांचा, शिक्षकांच्या हातचा मार खाल्ला का, असे विचारल्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी हसून त्यांच्या ठाण्यातील किसननगर मधील महापालिकेच्या शाळा क्रमांक २३ मधील आठवणी सांगितल्या. शिक्षक रघुनाथ परब कसे शिक्षा करायचे, याचा अनुभव सांगितले. लहानपणापासून दुसऱ्याला मदत करण्याची आवड होती व समाजकारणातून राजकारणात आल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. तुम्ही दाढी का करीत नाही, असे विचारता माझे गुरू धर्मवीर आनंद दिघे दाढी ठेवत असल्याने मीही ठेवतो. लग्नाच्या वेळेस मात्र दाढी काढली होती, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. सगळय़ा रंगांमध्ये मिसळून जाणारा पांढरा रंग मला आवडतो, त्यामुळे मी पांढरे कपडे घालतो, असे त्यांनी नमूद केले.

मला फुटबॉल, क्रिकेट खेळायला व पहायला आवडतात. मैदानी खेळ नेहमी खेळायचो. आता मोबाईलच्या जमान्यातही विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ खेळावेत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. मुलांनी मातृभाषेत शिक्षण घेण्याची आवश्यकता असून मराठी शाळांची पटसंख्या वाढावी, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

Story img Loader