पर्यावरणातील जंगल आणि पाणी या महत्त्वपूर्ण घटकांवर व निसर्गातील असंतुलनामुळे मानवी जीवनावर होत असलेल्या परिणामांबाबत पहिल्या दिवशी चर्चा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीची चर्चा शहरी व वैश्विक पर्यावरणावर होत आहे. पाण्यामधील नोबेल पुरस्कार समजल्या जाणाऱ्या स्टॉकहोम वॉटर प्राइजने गौरविले गेलेले जलदूत राजेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत शहरांना भेडसावणारे प्रश्न व त्याचवेळी पर्यावरणाशी निगडीत असलेला अर्थकारणाचा मुद्दा चर्चिला जाईल. कंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांचीही या परिषदेला उपस्थिती राहील.
हजारो गावे दुष्काळमुक्त करण्याचे भगीरथी कार्य करणारे जलदूत राजेंद्र सिंह यांनी लोकसहभागातून उभी केलेली पर्यावरणाची गाथा त्यांच्याच शब्दांमधून ऐकण्याची संधी या परिषदेतून मिळणार आहे. पर्यावरणाचे कार्य करताना टोकाची भूमिका घेण्याऐवजी राजेंद्र सिंह यांनी पारंपरिक साधनांचा नव्या पद्धतीने उपयोग केला. त्यांचे अनुभव व पर्यावरणाची भूमिका ही पर्यावरणात झोकून देणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी निश्चितच प्रेरणादायक ठरेल. औद्योगिकीकरण, त्यामुळे होणारे प्रदूषण, उपजिविकेच्या साधनांपायी वाढलेली लोकसंख्या आणि त्यातून निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय समस्या या सगळ्याचा आढावा शहर आणि पर्यावरण या परिषदेच्या दुसऱ्या दिवसाच्या चर्चासत्रातून घेतला जाणार आहे. स्वच्छता अभियानातून कचरा हा राष्ट्रीय प्रश्न असल्याचे अधोरेखित झालेले असतानाच या कचऱ्याच्या नाना तऱ्हा आणि त्यावरील उपाय यांचा उहापोह दुसऱ्या सत्रात होईल. अर्थकारण व पर्यावरण ही दोन्ही टोके आहेत की नाण्याच्या दोन बाजू यावर चर्चा रंगणार आहे तिसऱ्या सत्रात. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचीही अर्थकारण व पर्यावरणाबाबतची भूमिका यावेळी स्पष्ट होईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा