लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांच्या परिसरात साफसफाई करणाऱ्या सफाई कामगारांना प्रशासनाकडून रेनकोट, छत्री, गमबूट देण्यात येतात. मात्र यंदा जुलै महिना संपत आला तरी अद्याप शिवडी क्षयरोग रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून कोणत्याही प्रकारचे साहित्य पुरविण्यात आलेले नाही. यामुळे कर्मचाऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
रुग्णालय परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी चतुर्थश्रेणी कर्मचारी वर्गातील सफाई कामगारांची आहे. त्यामुळे ऊन पावसाची तमान बाळगता हे कर्मचारी रुग्णालयाच्या परिसरात नियमित साफसफाई करण्याचे काम करीत असतात. मुसळधार पाऊस कोसळत असतानाही त्यांना भिजतच रुग्णालय परिसरातील कचरा काढावा लागतो. रुग्णालय परिसरात स्वच्छतेचे काम करणाऱ्या चतुर्थश्रेणी कामगारांना दरवर्षी मुंबई महानगरपालिकेकडून रेनकोट, छत्री व गमबूट देण्यात येतात.
हेही वाचा… मुंबई: सांबरशिंग विकण्यासाठी आलेल्या आरोपींना अटक
मात्र यंदा जुलै महिना संपत आला तरी शिवडी क्षयरोग रुग्णालयातील या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना अद्याप कोणतेही साहित्य मिळालेले नाही. मागील काही दिवसांपासून मुंबई मुसळधार पाऊस कोसळत आहे. मात्र सफाई कामगारांना भरपावासात भिजत रुग्णालय परिसराची सफाई करावी लागत आहे. याकडे महानगरपालिका प्रशासन काणाडोळा करीत आहे. या प्रकारामुळे सफाई कामगारांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा… Mumbai Rain Red Alert : मुंबईत सर्वाधिक पाऊस कुलाबामध्ये, चर्चगेट जलमय
शिवडी क्षयरोग रुग्णालयातील सफाई कामगारांना तातडीने रेनकोट, छत्री, गमबूटचा पुरवठा करावा या मागणी म्युनिसिपल मजदूर युनियनने केली आहे. हे साहित्य उपलब्ध करण्यात आले नाही, तर ३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिवडी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा म्युनिसिपल मजदूर युनियनचे सरचिटणीस प्रदीप नारकर यांनी दिला आहे.