मुंबई : राजकारणात कार्यरत असताना आपण केवळ एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहोत, शत्रू नव्हे, हे प्रत्येकाने कायम लक्षात ठेवायला हवे. आपण एकमेकांचा आदर करायला हवा. चुकीच्या गोष्टींविरोधात प्रभावीपणे प्रतिकार जरूर करावा, पण त्याचबरोबर आपल्या प्रतिस्पध्र्याशी सन्मानाने वागावे. लोकप्रतिनिधी या नात्याने आपले विधानसभेतील आचरण अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण भावी पिढी समोरील आदर्श आहोत, असे प्रतिपादन माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी शनिवारी केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रीय आमदार परिषदेच्या समारोप सोहळय़ात ते बोलत होते. संविधान तयार करताना तत्कालीन नेत्यांना भविष्याप्रति असलेल्या जबाबदारीची तीव्र जाणीव होती. म्हणूनच, आपण त्यांच्या आदर्शाचे पालन करायला हवे. आज जगभरात भारताला नवी ओळख आणि सन्मान मिळाला आहे. मात्र, आपल्या समोर विविध आव्हाने आहेत. बेरोजगारी, दारिद्ऱ्य, निरक्षरता आदी विविध समस्यांशी देश झगडत आहे. लोकप्रतिनिधी म्हणून आपण व्यवस्थेतील दोष दूर करण्यासाठी सकारात्मक योगदान दिले पाहिजे, असे आवाहन नायडू यांनी उपस्थित आमदारांना केले. भारतातील विविध राजकीय पक्षांच्या आमदारांनी परिषदेत निरनिराळय़ा विषयांवर संवाद साधला.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण दरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून परिषदेत सहभागी झाले होते. देशाच्या उदारमतवादी आणि प्रजासत्ताक लोकशाहीचे जतन करणे आपल्या सर्वासमोर मोठे आव्हान आहे. या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी, तसेच प्रजासत्ताक देशाची मूळ संकल्पना अबाधित राखण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत, असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय आमदार परिषदेच्या समारोप सोहळय़ाला लोकसभेच्या माजी अध्यक्ष डॉ. मीरा कुमार, सुमित्रा महाजन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीनिवास पाटील, माकपच्या ज्येष्ठ नेत्या वृंदा करात, एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड उपस्थित होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The closing ceremony of the national council of mlas was held in mumbai on saturday amy