गणेशोत्सवाच्या काळात आचारसंहिता लागली तर? केवळ या आशंकेचा फटका गणेशोत्सव मंडळांना बसला आहे. विविध राजकीय नेत्यांची ‘फ्लेक्सबाजी’ ही पनवेल परिसरातील अनेक छोटय़ा-मोठय़ा गणेशोत्सव मंडळांच्या आर्थिक पथ्यावर पडत असते. यावेळी मात्र अनेक इच्छुक उमेदवारांनी आचारसंहितेच्या धसक्याने मंडळांच्या ठिकाणचे फलक, कमानी वा प्रवेशद्वार यांचे ‘प्रायोजक’ बनण्यास नकार दिला आहे. परिणामी मंडळांना लाखो रूपयांना फटका बसला असून, अनेक मंडळांचे अर्थकारण विस्कळीत झाले आहे. त्यामुळे मंडळांच्या प्रमुखांनी राजकीय नेत्यांची कास सोडून व्यापारीवर्गाकडे मोर्चा वळविला आहे.  
विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्याने यंदाचा गणेशोत्सव पूर्णपणे राजकीय उत्सव होणार असे चित्र होते. निवडणुकीमुळे यंदा तर या मंडळांनी प्रायोजकांसाठीचे दर वाढविले होते. एका मंडळाच्या प्रमुखाने दिलेल्या माहितीनुसार मुख्य प्रवेशद्वारावरील फलकासाठी यंदा ५० हजारापासून दोन लाखांपर्यंतचा दर सुरू आहे. प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस असणाऱ्या तीन बाय दोन फुटांच्या फलकाचा दर पाच ते दहा हजार रुपये एवढा ठेवण्यात आला आहे. यातून यंदा भरपूर पैसे जमा होतील, असा मंडळांचा आडाखा होता. अनेक मंडळांनी तर त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडे ‘फिल्डिंग’ही लावली होती. पण या दौलतजादा कार्यक्रमात मध्येच आचारसंहितेची माशी शिंकली.
ऐन गणेशोत्सवात आचारसंहिता लागू झाली तर तेलही गेले आणि तूपही गेले वर आचारसंहिताभंगाचे धुपाटणे पाठीशी लागले असे होऊ नये म्हणून या इच्छुक उमेदवारांनी विनाप्रसिद्धी वर्गणीचा मध्यममार्ग स्वीकारला आहे. त्यामुळे मंडळांचे अपेक्षित आर्थिक गणित मात्र ढासळले आहे.