मुंबई : जागतिक बँकेच्या सहकार्याने यापूर्वीही राज्यात अनेक मोठे प्रकल्प उभारले गेले असून भविष्यातही अनेक प्रकल्प उभारले जातील, पण केवळ पायाभूत सुविधांसाठी नव्हे तर इतरही क्षेत्रांत संस्थात्मक क्षमता बांधणीसाठी जागतिक बँकेने सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केले.

जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालकांसमवेत बैठकीत शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव मनोज सौनिक, मित्र संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी तसेच विविध विभागांचे सचिव आणि जागतिक बँकेतर्फे भारतातील कार्यकारी संचालक परमेश्वरन अय्यर उपस्थित होते. आपले राज्य हरित तंत्रज्ञान, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य सेवा आणि बंदर पायाभूत सुविधा या क्षेत्रात भरीव प्रयत्न करत आहे असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी नमूद केले.