मुंबई : गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता प्रकल्पाचा खर्च आणखी वाढला आहे. प्रकल्पस्थळी रस्त्याच्या खाली असलेल्या उपयोगिता वाहिन्या अन्यत्र हलवण्यासाठी आणखी ४७ कोटी रुपये लागणार असून त्यामुळे प्रकल्पाचा मूळ खर्च ६६६ कोटी रुपयांवरून ७१३ कोटी रुपयांवर गेला आहे. प्रकल्पाच्या खर्चात सात टक्के वाढ झाली असून सर्व करांसह प्रकल्पाचा खर्च ८६२ कोटींवर जाणार आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता प्रकल्प रखडलेला होता. सध्या या प्रकल्पाचे काम सुरू आहे. गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता हा पालिकेचा एक मोठा प्रकल्प असून त्यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा चौथा जोडरस्ता मुंबईकरांना उपलब्ध होणार आहे. अत्यंत गुंतागुंतीच्या या प्रकल्पाची मांडणी चार टप्प्यात करण्यात आली आहे. त्यापैकी तिसऱ्या टप्प्यात गोरेगाव येथे रत्नागिरी हॉटेलजवळ १२६५ मीटर लांबीचा सहा पदरी उड्डाणपूल बांधणे, मुलुंड खिंडीपाडा येथे उच्चस्तरीय चक्रीय उन्नत मार्ग तयार करणे व मुलुंडच्या डॉ. हेडगेवार चौकात १८९० मीटर लांबीचा सहा पदरी उड्डाणपूल बांधणे अशी कामे करण्यात येणार आहेत. या तीन पुलांसाठी एस. पी. सिंगला कंन्स्ट्रक्शन प्रा. लि. यांना डिसेंबर २०२१ मध्ये ६६६ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते. सध्या हे काम सुरू असून आता या प्रकल्पाच्या खर्चात वाढ झाली आहे.
हेही वाचा – मुंबई : वाहन चोरीप्रकरणी मध्य प्रदेशातून दोघांना अटक
या प्रकल्पाचे काम करीत असताना रस्त्याखालील विविध उपयोगिता वाहिन्यांचे जाळे विस्थापित होणार आहे. विद्युत तारा, ३०० मिमी व्यासाची जलवाहिनी आदी उपयोगिता वाहिन्या अन्यत्र वळवाव्या लागणार आहेत. या कामाचा खर्च कंत्राटदाराला स्वतंत्रपणे देण्यात येणार होता. त्यासाठी पालिकेने २० कोटी रुपयांची ठोक तरतूदही केली होती. मात्र १९९१ च्या विकास आराखड्यानुसार हा रस्ता १५ ते ३० मीटर रुंद होता. त्यानंतर २०३४ च्या विकास आराखड्याप्रमाणे या रस्त्याचे ४५.७० मीटर रुंदीकरण करण्यात आले आहे. त्यात भूमिगत उपयोगिता सेवांची समन्वय खूण नसल्यामुळे कंत्राटदाराने सर्वेक्षण व उत्खननाचे काम सुरू केल्यानंतर वेगवेगळ्या व्यासाच्या सांडपाणी व पिण्याच्या पाण्याच्या भूमिगत सेवा वाहिन्या आढळल्या. या भूमिगत सेवा वाहिन्या वळवण्यासाठी आणखी २५ कोटी रुपये खर्च येणार आहे. भूमिगत सेवा वाहिन्या वळवण्यासाठी एकूण ४५ कोटी ६८ लाख रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे कंत्राटाचा खर्च ६६६ कोटी रुपयांवरून ७१३ कोटी रुपयांवर गेला आहे. सर्व करांसह हा खर्च ८६२ कोटी रुपयांवर जाणार आहे.