मुंबई : गेल्या आठवडय़ात दोन दिवस पडलेल्या पावसाने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठय़ात मोठी वाढ झाली असून सुमारे ९७ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. पाणीसाठय़ातील तूट कमी झाल्यामुळे वर्षभराच्या पाणीकपातीचे संकट सध्या तरी दूर झाले आहे. मुंबईत आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ८५ टक्के पाऊस पडला आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांमध्ये मुंबई महानगराला पाणीपुरवठा करण्यासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतका उपयुक्त पाणीसाठा असावा लागतो. त्यामुळे वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा करणे महानगरपालिकेला शक्य होते. सातही धरणांत सध्या १४ लाख दशलक्ष लिटर म्हणजेच एकूण साठवण क्षमतेच्या ९६.७९ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. पाणीसाठय़ात आता केवळ तीन ते चार टक्के तूट आहे.
यंदा पावसाळय़ामध्ये प्रारंभी मुंबईस पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात असमाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे जलसाठा घटला होता. ही स्थिती लक्षात घेऊन पर्जन्यवृष्टीत सुधारणा होईपर्यंत मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मुंबईच्या पाणीपुरवठय़ात १ जुलै २०२३ पासून १० टक्के कपात केली होती. जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे ऑगस्ट महिन्यात मुंबईतील १० टक्के पाणीकपात रद्द करण्यात आली. मात्र ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिली व पाणीसाठा ९० टक्क्यांवर स्थिरावला होता. पाणीसाठय़ात आधीच दहा टक्के तूट होती आणि त्यातच सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ापासून पाणीपातळी कमी होऊ लागली होती. मात्र गेल्या आठवडय़ात मुंबई शहर आणि आसपासच्या जिल्ह्यांत गुरुवारपासून पडलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठय़ात भरघोस वाढ झाली आहे.
सातही धरणांतील पाणी पुढच्या वर्षी जुलैअखेपर्यंत पुरेल अशा पद्धतीने जल अभियंता विभागातर्फे नियोजन करण्यात येते. त्यामुळे यंदा वर्षभरासाठी पाणीकपात पुन्हा करावी लागते की काय अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र सध्या तरी ही चिंता मिटली आहे. शहराला दररोज सर्वाधिक म्हणजे १,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करणारा सर्वात मोठा भातसा तलावही यंदा ९८ टक्के भरला आहे. या तलावात ७ लाख १७ हजार दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे.
पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)
१० सप्टेंबर २०२३ १४,००,९६८ ९६.७९ टक्के
१० सप्टेंबर २०२२ १४,१७,५५८ ९७.९४ टक्के
१० सप्टेंबर २०२१ १३,८१,०६२ ९५.४२ टक्के