ठाण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या खोपट परिसरातील एसटी बस डेपोजवळ एका महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या वृत्ताने मंगळवारी एकच खळबळ उडाली होती. ठाण्याचेही दिल्ली तर होत नाही ना, अशी भितीही येथील सुजाण नागरिकांच्या मनात डोकावू लागली होती. ‘त्या’ युवतीच्या शवविच्छेदन प्राथमिक अहवालानंतर काही वेगळेच निष्कर्ष पुढे येऊ लागले आहेत. त्या युवतीवर बलात्कार झालेला नाही तसेच तिची हत्याही करण्यात आलेली नाही, असा निष्कर्ष या अहवालातून पुढे आला आहे. तिचा मृत्यू अति मद्य सेवनामुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे.
वागळे इस्टेट भागातील रघुनाथनगरमध्ये राहणारी उर्मिला निंबाडे (१६) या युवतीचा मृतदेह मंगळवारी रात्री खोपट एसटी डेपोजवळील नाल्याशेजारी सापडला होता. याच भागात उभ्या असलेल्या जीपच्या खाली तिघेजण तिला ढकलत होते. हा प्रकार पाहून जीप चालकाने धाव घेऊन त्यातील एकाला पकडले होते तर दोघेजण तेथून पळून गेले. या तिघांनी तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा संशय व्यक्त होत होता. हे तिघेही तिचे नातेवाईक असल्याचे पोलिसांच्या चौकशीत उघड झाले होते. तसेच ठाणे जिल्हा शासकीय रूग्णालयामध्ये तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता.
बुधवारी सकाळी तिच्या शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल आला असून त्यामध्ये तिच्यावर बलात्कार झालेला नाही तसेच तिची हत्याही झालेली नाही, असा प्राथमिक निष्कर्ष आहे. तिला दारूचे व्यसन होते. तसेच तिच्या शरीरामध्ये अल्कहोलचे प्रमाण आढळले आहे. त्यामुळे अति मद्य सेवनामुळे तिचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाजही या अहवाला व्यक्त करण्यात आला आहे, अशी माहीती नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे.डी. मोरे यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा