मुंबई : विकासकाने यापुढे करारनाम्यात पार्किंगबाबत संपूर्ण तपशील देणे महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाने (महारेरा) बंधनकारक केले आहे. पार्किंगबाबत असंख्य तक्रारी आल्यानंतर महारेराने हा निर्णय घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विकासकांकडून विकत घेतलेल्या आच्छादित, मेकॅनिकल, गॅरेज पार्किंगमध्ये इमारतीच्या बीममुळे वाहन उभे करता येत नाही, पार्किंग लहान असल्याने वाहन उभे करण्यात अडचण आदी अनेक तक्रारी महारेराकडे आल्या आहेत. महारेराने याची गंभीर नोंद घेतली असून घर खरेदीदारांना भविष्यात अशा समस्यांना सामोरे जावे लागू नये यासाठी सदनिका नोंदणीच्या वेळी दिल्या जाणाऱ्या वाटप पत्रात आणि विक्री करारांमध्येच पार्किंगचा सर्व तपशील असलेले जोडपत्र जोडणे बंधनकारक केले आहे. या जोडपत्रात जेथे पार्किंग दिले जाणार आहे तिथला क्रमांक, पार्किंगचा आकार, उंची, रुंदी, पार्किंगचे इमारतीतील ठिकाण याबाबतच्या सर्व उल्लेख करावा लागणार आहे. यात कुठल्याही त्रुटी राहू नये यासाठी महारेराने या जोडपत्राचा आदर्श मसुदाही जारी केला आहे.

हेही वाचा – मुंबई : १२ उद्यानांचा गैरवापर होत असताना पालिकेची डोळेझाक

डिसेंबर २०२२ मध्ये महारेराने जारी केलेल्या प्रमाणित विक्री करारात दैवी आपत्ती, चटईक्षेत्र (कारपेट एरिया), दोष दायित्व कालावधी आणि हस्तांतरण करार या बाबी प्रत्येक विक्री करारात बंधनकारक केल्या आहेत. याबाबत घर खरेदीदाराच्या संमतीने कुठलेही बदल केलेले असले तरी ते महारेराला मान्य होणार नाही, असे महारेराने जाहीर केले आहे. महारेराने आता या चार निकषांमध्ये पार्किंगचाही समावेश केला असून यापुढे पार्किंगचे संपूर्ण तपशील असलेल्या विहित जोडपत्राबाबत महारेरा आग्रही राहणार आहे. यामुळे पार्किंगच्या अनुषंगाने वाद निर्माण होऊन नव्या जागेत गेल्यानंतर जो मनस्ताप घर खरेदीदारांना सहन करावा लागतो, तो यापुढे सहन करावा लागणार नाही, अशी आशा महारेराने व्यक्त केली आहे.

हेही वाचा – कोकण मार्गावरील ‘वंदे भारत’, ‘तेजस’ रद्द? ‘आयआरसीटीसी’च्या संकेतस्थळावर रेल्वेगाड्या रद्द असल्याचा संदेश

यापूर्वीही महारेराने ३० जुलै २०२१ मध्ये परिपत्रक जारी करून पार्किंगच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. यात मोकळे पार्किंग क्षेत्र चटईक्षेत्रात मोजले जात नसल्यामुळे त्यासाठी विकासक पैसे आकारू शकत नाही, हे स्पष्ट केलेले आहे. शिवाय गॅरेज, आच्छादित पार्किंग याबाबतही या परिपत्रकात स्पष्टपणे मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. पार्किंगबाबत आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने ग्राहकहित अधिक संरक्षित करण्यासाठी हे नवीन परिपत्रक जारी करण्यात आलेले आहे.


Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The developer must provide information about parking new orders from maharera mumbai print news ssb